Pune, 27 August : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीच्या निमित्ताने शरद पवार यांना भेटत आहेत. लोकसभेतील पवार-मोहिते पाटील यांचा राजकीय डाव यशस्वी झाल्यानंतर विधानसभेला काय चित्र असणार याची उत्सुकता आहे. विजयदादांचे चिरंजीव तथा भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे. त्याबाबत विजयदादांनी आपल्याला त्याबाबत माहिती नाही, असे उत्तर दिले आहे.
पुण्यातील मांजरी (ता. हवेली) येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (VSA) गव्हर्निंग कौन्सिलची आज बैठक होत आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे व्हीएसआयमध्ये दाखल झाले आहेत. व्हीएसआयच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य असल्याने विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil) ही या बैठकीला दाखल झाले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अगोदर विजयसिंह मोहिते पाटील व्हीएसआयमध्ये दाखल झाले. त्या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) भाजपध्ये असून सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा होत असते.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये राहणार की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येणार? असा प्रश्न माजी खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मला त्याबाबत माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय निर्णयाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या कार्यक्रम शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती, त्यामुळे रणजितदादा शरद पवार गटात येणार, अशी चर्चा लोकसभा निवडणुकीच्य निकालानंतर जोरात सुरू आहे.
दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत भाजपला उमेदवाराचा पराभव केला होता, त्यामुळे पुतण्या आला, आता मुलगा राष्ट्रवादीत येणार का, अशी चर्चा रंगली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदेही उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आमदार बबनरव शिंदे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. मागील पंधरा दिवसांत त्यांनी शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे.
सोलापूरच्या राजकारणातील कट्टर विरोधक विजयसिंह मोहिते पाटील आणि माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे दोघेही गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य असल्याने ‘व्हीएसआय’च्या बैठकीला एकत्र आले आहेत. त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्याची सोलापूर जिल्ह्यात चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.