Akola District Political News : अकोला जिल्हा भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे दोन गट आहेत. हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नाही. विद्यमान खासदार संजय धोत्रे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय नसले तरी धोत्रेंचा गट मात्र 'ॲक्टिव'आहे. तर दुसरीकडे डॉ. रणजीत पाटील यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर सध्या तरी ते राजकारणात सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. (The question is being asked what Dr.Patil is doing now)
डॉ. पाटील सध्या काय करतात, असा प्रश्न विचारला जात आहे. धोत्रेंचा गट हा पाटील गटाला महत्त्व देत नाही. त्यामुळेही कदाचित डॉ. पाटील हे सध्यातरी जिल्ह्यातील सक्रिय राजकारणात सक्रिय नसल्याचे बोलले जात आहे. एके काळी अकोला जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जायचा मध्यंतरी काँग्रेस नेत्यांच्या आपसातील वादांमुळे भाजपला बळ मिळाले.
लोकसभेसह विधानसभा व महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्या. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जिल्ह्यातील वर्चस्व कायम आहे. संजय धोत्रे हे चार टर्मपासून अकोल्याचे खासदार आहेत. जिल्ह्यातील राजकारणात डॉ. रणजीत पाटील यांचा प्रवेश झाल्यानंतर अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या पहिल्याच निवडणुकीत ज्येष्ठ आमदार बी. टी. देशमुख यांचा धक्कादायक पराभव करून डॉ. पाटील यांची विधानपरिषदेत 'एन्ट्री' झाली.
डॉ. पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सर्वच महत्त्वपूर्ण खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी डॉ. पाटील यांच्याकडे दिली होती. डॉ. रणजीत पाटील हे मंत्री झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा वाढला. थेट देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी असल्याने जिल्ह्यात दोन गटांतील वर्चस्वाची लढाई वाढत गेली.
याच लढाईतून अकोला जिल्हा भाजपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात भाजपमध्ये विदर्भातील ज्येष्ठ नेत्यांमधील सुप्त संघर्षाचे पडसाद अकोला भाजप मध्येही पाहायला मिळत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे गडकरींचे कट्टर समर्थक आहेत. तर गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत.
मात्र डॉ. रणजीत पाटील यांच्या पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर ते सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे सध्यातरी डॉ. पाटील हे 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे संजय धोत्रे हे आजारपणामुळे सक्रिय नसले तरी त्यांचा गट मात्र सक्रिय आहे. धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना भाजपकडून 'प्रोजेक्ट' करण्यात येत आहे.
धोत्रेंचा जिल्ह्यात भाजपचा गट मोठा असल्याने हा गट सक्रिय आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी या गटाची जोरदार तयारी सुरू आहे. तर डॉ. रणजीत पाटील हे लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीसाठीही सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचा गट सध्या शांतच आहे.
डॉ. रणजीत पाटील सध्या काय करतात?
डॉ. रणजीत पाटील यांचा २०२३ च्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केल्यानंतर डॉ. पाटील हे जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. सध्या डॉ. पाटील गट जिल्ह्यातील भाजपच्या कार्यक्रमात सहभागी होत नसतो. डॉ. पाटील यांचा फोटो तर सोडा साधं नावही भाजपच्या कार्यक्रमात किंवा बॅनरवर पाहायला मिळत नाही.
भाजपचा कुणी मोठा नेता आला तर डॉ. पाटील हे तेवढ्यापुरते कार्यक्रमात दिसतात. सध्या डॉ. पाटील आपल्या वैद्यकीय व्यवसायात 'बिझी' झाले असून ते 'वेट अँड वॉच' भूमिकेत आहेत. मध्यंतरी पराभवानंतर डॉ. रणजीत पाटील हे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ते जिल्ह्यात सक्रिय नसल्याने चर्चाही थांबली. मात्र ऐनवेळी डॉ. रणजीत पाटील कोणते ‘पत्ते' टाकतील हे सांगता येत नाही.
डॉ. रणजीत पाटील यांना विधानपरिषदेची संधी!
विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात अर्जदाराने याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे प्रकरण निकाली निघाले आहे. डॉ. रणजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी असल्याने त्यांना या १२ आमदारांमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास डॉ. पाटील हे पुन्हा सक्रिय होतील, असे म्हणायला काही हरकत नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.