Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan  sarkarnama
विदर्भ

BJP News: मोठी बातमी: महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं 'मायक्रो प्लॅनिंग'; 130 नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट

BJP Nagpur municipal election 2025: जानेवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2007 च्या निवडणुकीत भाजपचे 150 पैकी 108 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला होता.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. यंदाच्या निवडणुकीत 130 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठरवण्यात आले आहे. याकरिता मायक्रो प्लॅनिंग केले जात असून विधानसभानिहाय पक्षाच्या मंडळांची संख्यासुद्धा वाढवण्यात आली आहे. सर्व मंडळात जाऊन भाजपचे शहराध्यक्ष प्रत्येकाशी चर्चा करून उमेदवारांची चाचपणी करणार आहे.

जानेवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2007 च्या निवडणुकीत भाजपचे (BJP) 150 पैकी 108 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला होता. पन्नास वर्षांच्या इतिहासात भाजपने प्रथमच स्वबळावर सत्तास्थापन केली होती. केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स आणखीच वाढला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे शहर असले तरी भाजपला एकहाती सत्ता मिळेल याची शाश्वती नाही. लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी यांचे मताधिक्य घटले होते. सहापैकी दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.

आपला जनाधार टिकवून ठेवण्यासाठी भाजपने महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा संघटनेवर भर देणे सुरू केले आहे. याकरिता ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना शहराध्यक्ष केले आहेत. तिवारी हे नागपूरचे महापौर आणि नागपूर महापालिका स्थायी समितीचे सभापती होती. विधानसभेचीसुद्धा ते निवडणूक लढले आहेत. त्यांच्यात नेतृत्वात महापालिकेच्या निवडणुकीसाठी बूथ स्तरावर रणनीती तयारी केली जात आहे.

पूर्वी भाजपचे सहा विधानसभा मतदारसंघात सहा मंडळ अशी रचना होती. ती आता 20 वर नेली आहे. प्रत्येक मतदारसंघात तीन ते चार मंडळ कार्यरत राहणार आहेत. मंडळांचे अध्यक्ष, महामंत्री,वार्ड अध्यक्ष बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, वरिष्ठ तथा प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून महापालिका निवडणुकीतील प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे.

याची सुरुवात झिंगाबाई टाकळी मंडळापासून सुरुवात करण्यात आली आहे. या बैठकीत नऊ वॉर्डांचे अध्यक्ष, महामंत्री, 106 बूथ अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यात आली.नागरिकांच्या काय अडचणी आहेत, कार्यकर्त्यांचे काय प्रश्न आहेत, कोणाची नाराजी, नाराजीचे कारण हे या सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींचा माहिती घेण्यात आली.

भाजप संघटनेच्या कार्यक्रमांमध्ये कोण हजेरी लावतो. कोणी सक्रिय असतो याचाही आढावा घेण्यात आला. राज्य व केंद्र शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही याचीसुद्धा माहिती घेण्यात आली. ही सर्व मशागत महापालिकेची निवडणूक आणि उमेदवार निवडण्यासाठी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT