krishna khopde-Abhijeet Wanjari Sarkarnama
विदर्भ

Vidharbha Politic's : मुलाला काँग्रेस प्रवेशाची ऑफर देणाऱ्या आमदाराला भाजप आमदाराने सुनावले; ‘लक्ष्मीदर्शन करणाऱ्यांना तिकिटे देता अन्‌...’

MLA Krishna Khopde : भाजपने कृष्णा खोपडे यांच्या पुत्राला महापालिकेचे तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या ऑफरवरून नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 01 January : भाजपचे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताने निवडून आलेले आमदार कृष्णा खोपडे यांच्या पुत्राला भाजपने महापालिकेची उमेदवारी नाकारली. मात्र, काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यावरून आता दोन्ही आमदारांमध्ये वाक्‌युद्ध रंगले आहे. वंजारी यांनी माझ्या पुत्राला ऑफर देण्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांभाळावे, त्यांना तिकीट मिळवून द्यावे, असा सल्ला खोपडे यांनी दिला आहे.

आमदार कृष्णा खोपडे (MLA Krishna Khopde) पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. यावेळी विदर्भात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला आहे. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मुंबईत विशेष सत्कारही केला होता. त्यांचे पुत्र रोहित खोपडे यांनी या वेळी महापालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.

रोहित खोपडे यांनी भाजपकडे (BJP) रीतसर अर्ज करून उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपने कुठल्याच नेत्यांच्या मुलाला तिकीट द्यायचे नाही, असे ठरवले होते. त्यामुळे नाराज झालेल्या रोहित खोपडे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. हे टायमिंग साधून पूर्व नागपूरमधून खोपडे यांच्या विरोधात लढलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी त्यांची खोड काढली आहे.

रोहित यांचा भाजप आणि आमदार असलेल्या वडिलांवर विश्वास राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यापेक्षा त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, असा सल्ला दिला होता. त्यावर आज आमदार कृष्णा खोपडे यांनी वंजारी यांच्या ऑफरचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, अभिजित वंजारी यांची ऑफर हास्यास्पद आहे. काँग्रेसमध्ये बूथ कार्यकर्त्यांपासून नेत्यांवरही अन्याय होत आहे. वंजारी यांना आपल्याच समर्थकांना तिकिटे मिळवून देता आले नाही. त्यांनी आधी आपली राजकीय उंची वाढवावी.

काँग्रेसमध्ये परिवार वाद चालतो. निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जाते. महापालिकेच्या निवडणुकीत प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आहे. लक्ष्मीदर्शन करणाऱ्यांना तिकिटे देण्यात आली आहेत, असा आरोप खोपडे यांनी केला. वंजारी यांनी आधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही खोपडे यांनी दिला आहे.

रोहित खोपडे हा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. एक कार्यकर्ता म्हणून त्याने पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पक्षाने नकार दिल्यानंतर त्याने पक्षाने निश्चित केलेले उमेदवार संजय अवचट यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. पक्षाचा निर्णय स्वीकारला आहे. त्याने कुठल्याच पदाचा राजीनामा दिलेला नाही. पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे स्वागत करून भाजपचा सच्चा कार्यकर्ता असल्याचा परिचय रोहित यांनी दिला असल्याचे आमदार खोपडे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT