Nagpur News, 23 Dec : नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास घडवला. सर्वाधिक नगरपालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता भाजपकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या आहेत.
दीडशे जागांसाठी तब्बल पाच हजार कार्यकर्ते तिकिटासाठी रांगेत लागलेत. हे बघून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा चक्रावून गेले आणि म्हणाले आता आमच्यावर आमचेच कपडे फाडण्याची वेळ आली आहे. ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी गडकरी म्हणाले, 'मला आत्ता कळले, 5 हजार कार्यकर्त्यांनी महापालिकेचे तिकीट मागितले म्हणून. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तुमचे काम केले. आता आमची निवडणूक आहे. आमचे कसे असे तुम्ही म्हणत असला. आपण सर्वांनाच सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आजची परिस्थिती ही आमच्यासाठी कपडे फाडणारी आहे.
पक्षाकडे तिकीट मागण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्ही मैदानात आहात. मात्र ज्यावेळी पक्षातर्फे उमेदवारांची नावे जाहीर होतील त्यानंतर त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्याच्या मागे कट्टर कार्यकर्ते म्हणून उभे राहा. हीच भाजपची ओळख आहे. त्याच्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यायची आहे असे सांगून पक्षाच्या निर्णय अंतिम माना असा सल्लाही यावेळी गडकरींनी यावेळी दिला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर शहरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे चार आमदार निवडून आले. मागील निवडणुकीत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता नागपूर महापालिकेत पुन्हा भाजपच निवडून येण्याची शक्यता आहे.
साहजिक सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपकडे लढणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही सर्वाधिक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट हवे आहे. आता थांबण्याची कोणाचीच तयारी नाही. वयाची पन्नाशी पार झालेल्या कार्यकर्त्यांनी ही शेवटची संधी आहे. आम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल ते करीत आहे. त्यामुळे तिकीट वाटप करणे भाजपसाठी अवघड होऊन बसले आहे. कुणालाही तिकीट दिले तरी निम्म्यापेक्षा जास्त कार्यकर्ते नाराज होणार आहेत. त्यामुळे आता यातून भाजप कसा मार्ग काढते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.