Beed News, 23 Dec : बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणूक निकालानंतर गुलालाचा धुराळा उडत आहे. यात अनेक ठिकाणी धक्कादायक आणि रोमहर्षक लढतींचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये किल्ले धारूर नगरपरिषदेच्या निकालात एका बावीस वर्षीय डॉक्टर तरुणीने बाजी मारत दिमाखदारपणे नगरपरिषदेत एन्ट्री केली आहे.
जिल्ह्यात सहा पैकी बीड, धारुर व परळी या सर्वाधिक तीन नगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून गेवराई नगर पालिकेवर भाजपने झेंडा फडकविला आहे. तर, अंबाजोगाईत भाजप पुरस्कृत आघाडीचे नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्ष झालेत. माजलगाव मतदार संघातील धारुर नगर पालिकेतील भाजपची सत्ता उलटविण्यात आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने यश मिळविले आहे.
नगराध्यक्षपदासह 20 पैकी 11 नगरसेवक पदे पटकावत राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे धारूर नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती गेल्या आहेत. या निवडणुकीत शहरातील पेठ विभागातील प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. आकांक्षा फावडे यांनी विजय मिळवत विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
अवघ्या 22 व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी धारूर नगरपरिषदेतील सर्वात तरुण नगरसेवक होण्याचा मान पटकावला आहे. होमिओपॅथीत पदवी पुर्ण केल्यानंतर शहरातील सामाजिक व राजकीय वर्तुळातही त्यांनी उठबस वाढविली. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. डॉ. आकांक्षा फावडे या धारूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे यांची नात आहेत.
त्यांच्या या यशामुळे शहराच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी सामाजिक जाणीव व विकासात्मक दृष्टीकोन अधोरेखित करत घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला.पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, महिला व युवकांचे प्रश्न यांसह नागरी मूलभूत सुविधांवर त्यांनी स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडली होती.
त्यांच्या या सकारात्मक प्रचाराला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. निकालांनतर त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंकुशनगर येथे जाऊन भेट घेतली. जरांगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, माझे आजोबा शेषेराव फावडे हे धारूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष होते.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोक हिताचे कामे करत धारूर शहर वेगळ्या उंचीवर नेले आहे त्यांचा सामाजिक वारसा कायम राहावं या दृष्टीने मी राजकारणात आले आहे. माझ्या प्रभागातील मतदार बंधूनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवणार असल्याचा विश्वास डॉ. आकांक्षा फावडेंनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.