BJP Sarkarnama
विदर्भ

BJP News : दिल्लीत 'लाल दिवा' देतो सांगत महाराष्ट्रातील भाजप नेत्याची फसवणूक : तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची केली होती डिमांड

BJP News : केंद्रीय राज्यमंत्री दर्जा मिळवून देण्याचे आमिष दाखवत भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना स्टिंग ऑपरेशननंतर पोलिसांनी अटक केली आहे.

Hrishikesh Nalagune

BJP News : केंद्रात राज्यमंत्री पदाचा दर्जा देतो, असे म्हणून भाजपच्या यवतमाळच्या जिल्हा समन्वयकांना फसविण्याचा तिघांनी प्रयत्न केला. परंतु, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनीच केलेल्या ‘स्टिंग’ मुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या. लौकिक जगन्नाथ फुलकर (रा. नेताजी नगर), गणेश लालसिंग राठोड (रा. दाभा पहूर, बाभूळगाव), विश्‍वजित सुरेश राठोड (रा. ब्राम्हणवाडा, आर्णी) अटक केली. तर तिघांनाही ३ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन भुतडा हे भाजपचे जिल्हा समन्वयक आहेत. शनिवारी (ता. १६) त्यांना आरोपी लौकिक फुलकर याने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मॅसेज केला. केंद्र सरकार अंतर्गत येणार्‍या ४२ महामंडळाची यादी टाकली. त्याचप्रमाणे इतर २३ बोर्डाची यादी, नियुक्तीवरील व्यक्तींना असणारे बजेट, नियुक्तीचा कालावधी, सॅलरी, सुविधा, कार्यक्षेत्र आणि अधिकाराबाबत विस्तृत माहिती दिली. हे काम गणेश राठोड करणार असल्याचेही सांगितले. यादीतील तीन महामंडळ निवड करून पाठवावे याकरिता संपर्क केला.

दरम्यान, हा प्रकार आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशातून सुरू असल्याचा संशय भुतडा यांना आला. बुधवारी (ता. २०) गणेश राठोड यांच्या मोबाईलवर भुतडा यांनी ३ महामंडळाची नावे जाणीवपूर्वक टाकली. या मंडळासाठी समोरून त्यांना २० कोटी ५० लाख रुपयांची ‘डिमांड’ झाली. त्या मोबदल्यात ५ टक्के टोकन द्यावे लागेल, असे सांगितले. तर सोमवारी टोकन पोहचेल, मंगळवार आणि बुधवारी ‘क्लिअर’ होईल. यासंदर्भात दिल्लीतून कॉल येईल आणि शुक्रवारपर्यंत सर्व ओके होईल, असा रिप्लाय दिला.

भुतडा यांनी पैसे जमा करण्यास विलंब होईल, असे सांगून सुरवातीला सर्व व्यवहार टाळले. परंतु, लौकिक फुलकर याने पुन्हा पदाचे आमीष देवून शनिवारी (ता. ३०) सकाळी संपर्क साधला. दरम्यान, दत्त चौकातील माजी आमदार मदन येरावार यांच्या कार्यालयात भेटीचे ठरले होते. हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचा संशय आल्यानंतर कार्यालयात ‘स्पाय वायफाय मेटल क्लॉक’ खरेदी केले. त्यात नवीन मेमरी कार्ड टाकून कार्यालयातील सर्व भाग कव्हर होईल, या पद्धतीने लावला होता.

व्यवहाराकरिता एक ब्राऊन रंगाची लेटर सारखी बॅग घेऊन ५० लाख रुपये असल्याचे भासविले. बॅगमध्ये कागदाचे रिम, नोटबुक आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे ५० हजारांचे बंडल ठेवले होते. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास गणेश राठोड, विश्‍वजित राठोड यांनी कार्यालय गाठत चर्चा केली आणि पैसे ठेवून असलेली बॅग घेऊन ते निघून गेले. या प्रकरणी सायंकाळी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नितीन भुतडा यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून, तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पहिल्यांदा जाणीवपूर्वक व्यवहार टाळला :

या प्रकरणातील आरोपी गणेश राठोड याने शुक्रवारी (ता. २२) नितीन भुतडा यांच्याशी संपर्क साधून विश्‍वजित राठोड याच्याकडे टोकन जमा करावे, असे सांगितले. त्यानुसार शनिवारी (ता. २३) दत्त चौकातील माजी आमदार मदन येरावार यांच्या कार्यालयात विश्‍वजित राठोड आला होता. परंतु, संपूर्ण व्यवहार गणेश राठोड आल्यानंतरच करू, असे म्हणून जाणीवपूर्वक टाळला होता. पैशाच्या हव्यासापोटी पुन्हा त्यांनी संपर्क साधून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. यातून त्या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT