

Yavatmal News : यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेला संघर्ष अखेर नामांकनाच्या शेवटच्या दिवशी उघडपणे समोर आला. भाजपच्या दबावतंत्रामुळे शिंदेसेनेला ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अखेर पालकमंत्री संजय राठोड यांच्या ‘मनातील’नाव मागे पडत माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. सोमवारी (ता. एक) अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांनी 10 नामांकन दाखल केले आहे. यात शिंदेसेना, भाजप, काँग्रेस तसेच अपक्षांचा समावेश आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी सुरवातीपासूनच शिंदेसेनेकडून सलीम खेतानी यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजपचा तीव्र विरोध असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करून शिंदेच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले. भाजपच्या या राजकीय खेळीमुळे शिवसेनेची कोंडी झाली आणि उमेदवार निश्चित करताना पालकमंत्री संजय राठोड यांना मोठी कसरत करावी लागल्याचे बोलले जात आहे.
राजकीय घडामोडींना वेग आला तो शेवटच्या काही तासांत. खेतानी यांच्या ऐवजी शीतल राठोड यांचे नाव आघाडीवर आले. तशी तयारीही सुरू झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून ग्रीन सिग्नल येणे बाकी होते. मात्र, काही वेळातच परिस्थिती बदलली आणि राठोड यांनी दुष्यंत चतुर्वेदी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करावी लागली. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत पक्षात संभ्रमाचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान भाजपकडून नितीन भुतडा यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार किसन वानखेडे, माजी आमदार अॅड. निलय नाईक, राजू पडगीलवार, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनाने भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीचे रणांगण सज्ज केले. यावेळी ज्येष्ठ नेते माणिकाराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील या निवडणुकीत महायुतीतच उमेदवारीवरून निर्माण झालेला संघर्ष आणि भाजप-शिंदेसेनेतील सुप्त नाराजी आता उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांची उमेदवारी ही राजकीय तडजोड की भाजपच्या दबावाची फलश्रुती, याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.
महायुतीत मोठा भाऊ कोण?
यवतमाळ विधान परिषद उमेदवारीच्या घडामोडींनी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाजपच्या एका अर्जाने शिंदेसेनेची संपूर्ण रणनीती बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
‘एम’ फॅक्टरला विरोध
भाजपने पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर ‘एम’ फॅक्टरला विरोध आहे. यामुळे पालकमंत्री राठोड यांनी ताकद लावल्यानंतरही भाजपच्या दबावतंत्राने शिंदेसेनेची जागा असूनही उमेदवार बदलण्याची वेळ सेनेवर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पाच उमेदवार 10 अर्ज
विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केले आहे. यात साहेबराव कांबळे यांनी दोन, दृष्यंत चतुर्वेदी तीन, नितीन भुतडा तीन, सैय्यद फारुक तसेच मोहमद साजिद यांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.