Sunil Kedar, Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar : सुनील केदारांना सावनेरमध्येच घेरण्याचा भाजपचा प्लॅन; वळसे पाटलांवरही वाढवला दबाव

Rajesh Charpe

Nagpur 1 August : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी ठरवलेले राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांना आता त्यांच्याच सावनेर विधानसभा मतदारसंघात घेरण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे. सोबतच वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्यावरही दबाव वाढवला जात आहे.

बँक घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या केदार यांच्याकडून वसुलीची कारवाई करावी यासाठी भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते तसेच ओबीसी सेलचे राज्य समन्वयक आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या नेतृत्वात उद्या शुक्रवारपासून सावनेर येथे शेतकरी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. केदार अध्यक्ष असताना बँकेत सुमारे तब्बल 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांना वाचवले जात होते.

यास आता 22 वर्षे उलटून गेली आहे. न्यायालयाने केदार (Sunil Kedar) यांच्याकडून 1444 कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यांना पाच वर्षांची शिक्षासुद्धा ठोठवली आहे. वसुली संदर्भात 30 जुलै सुनावणी ठेवली होती. मात्र सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ती पुढे ढकलली. त्यावेळी देशमुखांनी केदारांना वाचवण्यासाठी दिलीप वळसे पाटील प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता.

केदार आणि वळसे यांचे जुने संबंध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशमुखांनी केदारांच्या सावनेर विधानसभा (Savner Vidhansabha) मतदारसंघातच बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात शेतकही सहभागी होणार असून या माध्यमातून वळसे पाटील यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढवण्यात येणार आहे.

केदारांच्या आदेशावरून नागपूर जिल्हा परिषदेने 22 कोटी रुपयांच्या ठेवी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवल्या होत्या. त्या 22 वर्षांपासून त्या अडकून पडल्या आहेत. सहा वर्षांत बँकांमध्ये रक्कम दुप्पट होते. बावीस वर्षांचा हिशेब लावल्यास व्याजासह किमान कोटी रुपये जिल्हा परिषदेला (Jilha Parishad) बँकेकडून घेणे आहे. याशिवास पंचायत समिती, नगरपालिका, ग्राम पंचायतीच्या ठेवी, कर्मचारी व शेतकऱ्यांच्या ठेवीसुद्धा अडकून पडल्या आहेत. बँकेतील घोटळ्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्जसुद्धा मिळत नाही. त्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हा राजकीय मुद्दा नाही. सावनेरमधून कोणाला लढवायचे हा भाजपचा प्रश्न आहे. मात्र केदारांवर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजे यासाठी आपला लढा असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT