Akola West Assembly Constituency Google
विदर्भ

Akola West : भाजप, शिंदे सेना दोघांकडूनही नव्या चेहऱ्याचा शोध

जयेश विनायकराव गावंडे

Maharashtra Assembly Elections : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ. गेल्या तीन दशकांपासून भाजपचा अभेद्य गड. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा (लालाजी) यांच्या निधनामुळं आता त्यांच्या जागेवर नव्या चेहऱ्याचा शोध भाजपनं सुरू केलाय. इतकेच नव्हे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटानंही या जागेसाठी उमेदवाराच्या नावाचा विचार सुरू केलाय. भाजप आणि शिंदे गटात एकमत झाल्यास अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा शिंदे गटाला सुटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात हिंदुत्ववादी चेहरा लागतो. असा चेहरा सध्या भाजपजवळ नाही. जो चेहरा या मतदारसंघातून भाजपला उमेदवारी मागण्याच्या तयारीत आहे, त्याला स्थानिक भाजपमधूनच विरोध होण्याची दाट शक्यता आहे. (BJP & Shivsena Eknath Shinde group in search of new face in Akola West Assembly Constituency)

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाजवळ असा चेहरा तयार आहे, जो अकोला पश्चिममध्ये हिंदुत्ववादी म्हणून ‘प्रोजेक्ट’ होऊ शकेल. मात्र, महायुतीत ही जागा सध्या भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे लवकरच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळू शकते काय, याबद्दल उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.

आमदार गोवर्धन शर्मा यांनी सलग सहा टर्म हा मतदारसंघ भाजपकडं ठेवला. त्यांच्यानंतर विधानसभेत संख्याबळ जुळविण्यासाठी प्रत्येक मतदार संघ आपल्या खात्यात ठेवणं भाजप व शिवसेनेला गरजेचे आहे. त्यामुळं संख्याबळ वाढविण्यासाठी अकोला पूर्वची जागा भाजप आपल्याकडं ठेवत अकोला पश्चिम एकनाथ शिंदे यांच्या गटाला सोडू शकते, असे एका जबाबदारी नेत्यानं ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

१९९५ पासून सलग सहा वेळा अकोला पश्चिम मतदारसंघावर भाजपनंच आपलं नाव कोरलय. आमदार गोवर्धन शर्मा यांना या मतदारसंघातील व्यापाऱ्यांचाही मोठा पाठिंबा होता. शर्मा यांच्यानंतर तसाच चेहरा मिळणं भाजपसाठी थोडं अवघड आहे. भाजपनं येथे उमेदवार दिलाही तरी त्याचं नाव जाहीर होताच येथे अंतर्गत गटबाजीमुळं त्याचा पराभव पक्का मानला जातोय. त्याचं कारण म्हणजे जी नावं या मतदार संघातून वरिष्ठ पातळीपर्यंत गेली आहेत. त्यापैकी अधिकांश नावांना स्थानिक नेत्यांचा विरोधच आहे.

अशात वेळप्रसंगी भाजप अकोला पश्चिमची जागा शिंदे गटाला देण्यास सहज तयारही होऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नेत्यांशी बोलताना तसे संकेतही दिलेत. राज्यातील जागांबाबत जेव्हा वाटाघाटी सुरू होईल, त्यावेळी अकोला पश्चिमच्या जागेबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नक्की बोलणार आहोत, असं शिंदे यांनी नेत्यांना शब्द दिलाय. यासंदर्भात अगदी प्राथमिकस्तरावर शिंदे यांनी ही बाब भाजप नेत्यांच्या कानावरही घातलीय. मात्र अद्याप कोणतीही कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचलेलं नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीनंही युती केलीय. त्यामुळं अकोला पश्चिमच्या जागेवर उद्धव ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी दोन्हीही नजर ठेऊन आहेत. उद्धव ठाकरे गटाजवळीही अकोला पश्चिमसाठी उमेदवार तयार आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी त्या उमेदवाराची भेटही उद्धव ठाकरे यांच्याशी मुंबईत घडविली. अकोला पश्चिम मतदारसंघ आपल्याकडंच हवा यावर जोर द्याच, अशी विनंती ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांनी उद्धव यांना केलीय. त्यावरही ठाकरे यांनी आपण अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणार असल्याचं स्पष्ट केलंय.

भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी यापैकी कुणालाही अकोला पश्चिमची निवडणूक लढायची असल्यास आमदार गोवर्धन शर्मा यांच्याप्रमाणचे किंवा त्यापेक्षाही तगडा चेहरा लागणार आहे. त्यामुळं कुणाला उमेदवारी देता येईल, यासाठी सध्या सर्वच पक्षांमध्ये शोध मोहीम सुरू झालीय. अशात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सध्या मागे आहेत. मात्र, तेदेखील यासंदर्भात लवकरच हालचाली करतील असं दिसतेय.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT