Senior BJP leader and former minister Sudhir Mungantiwar has been excluded from the party's election committees for upcoming local body polls in Chandrapur 
विदर्भ

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा डच्चू; अमित शाहंच्या भेटीचाही फायदा झाला नाही, देवाभाऊचे दार अजूनही बंदच!

Sudhir Mungantiwar News : सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकांतही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्या भूमिकेवर आणि प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Rajesh Charpe

Sudhir Mungantiwar News : माजी मंत्री, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यातून त्यांचे पक्षात खच्चीकरण केले जात असल्याची सर्वत्र चर्चा आहे. या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. भाजपने स्थानिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी नियुक्त केले आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 3 आमदारांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र मुनगंटीवार स्थानिक निवडणुकीपासून लांबच ठेवण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार आणि भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. पक्षाच्यावतीने जोरगेवारांना बळ दिले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे जवळपास सर्वच नेते त्यांच्या बाजूने उभे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केलेल्या चंद्रपूरच्या दौऱ्यात मुनगंटीवार कुठेच दिसेल नाहीत. याउलट जोरगेवार त्यांच्या गाडीतून फिरताना दिसले. हे एक प्रकार मुनगंटीवारांना संकेतच दिले असल्याचे बोलले जात आहे.

त्यानंतर भाजपच्या जिल्हा आणि शहर कार्यकारिणीवरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. येथील कार्यकारिणी अनेक दिवस रखडली होती. शेवटी ग्रामीणमध्ये मुनगंटीवार तर शहरात जोरगेवार यांच्या समर्थकाला जिल्हाध्यक्ष करण्यात आले. मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचे वेध लागले आहे. मध्यंतरी त्यांना भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते. त्यावरून मुनगंटीवार यांचे राज्याच्या मंत्रिमंडळातील स्थान पक्के झाल्याचे मानले जात होते. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातही फेरबदल होतील असे दावे केले जात आहेत.

असे असले तरी भाजपच्या टीमने मुनगंटीवार यांना चंद्रपूर जिल्ह्यातही स्थान दिले नाही. हे बघता त्यांच्यावरची नाराजी अद्याप दूर झाल नसल्याचे दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हा प्रमुख आणि निवडणूक प्रभारी प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती केली आहे. तर गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी राहणार आहेत.

चंद्रपूर ग्रामीणमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून आमदार देवराव भोंगळे, चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार बंटी भांगडिया यांना गडचिरोलीची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. यापैकी तिघांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सुधीर मुनगंटीवार सर्वात सिनिअर नेते आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहे. राज्याचे अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक खात्याचे मंत्री अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. मात्र स्थानिक निवडणुकीत त्यांच्यावर कुठलीच जबाबादारी पक्षाने सोपवलेली नाही. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपने आपल्याला डच्चू दिल्याच्या बातम्यांमध्ये काही अर्थ नसल्याचे सांगितले. मी बिहारच्या निवडणुकीत आहेत. तिथे माझ्या काही प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूरमध्ये वेळ देता येणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT