Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : भाजप आपलाच रेकॉर्ड मोडणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले जनतेच्या मनात कोण?

Nagpur Corporation Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत यंदा भाजपमध्ये नाराजी व बंडखोरी दिसत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाईक रॅली काढत मागील निवडणुकीचा रेकॉर्ड मोडण्याचा दावा केला आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 12 January : नागपूर महापालिकेत मागील निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. ही आजवरची विक्रमी कामगिरी ठरली होती. काँग्रेसमधील भांडणे आणि तिकीट वाटपाच्यावेळी झालेला राडा याचाही फायदा भाजपला झाला होता. या निवडणुकीत असा कुठलाच प्रकार काँग्रेसमध्ये घडला नाही, उलट भाजपमध्ये नाराजी आणि बंडखोरी सर्वाधिक असल्याचे बघायला मिळते. त्यामुळे यंदा भाजपचे किती नगरसेवक निवडून येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बाईक रॅली काढून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यावेळी त्यांनी आम्ही मागच्या निवडणुकीचा रेकॉर्ड मोडणार असल्याचा दावा केला आहे.

नागपूर (Nagpur) महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत १५१पैकी भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस २९ वर थांबली होती. बसपा १० तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये मोठी मारामारी झाली होती.

आमदार नितीन राऊत यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीवर हल्ला केला होता. प्रचाराला आलेले तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाई व अंडी फेकण्यात आली होती. काँग्रेसमध्ये (Congress) उभे दोन गट पडले होते. एकमेकांना पाडण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यात तत्कालीन अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला होता.

आता काँग्रेसमधील भांडणे बऱ्याच प्रमाणात मिटली असल्याचे दिसून येते. तिकीट वाटप करताना कुठलाही वाद झाला नाही. सर्वच बंडखोरांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. तिकीट वाटप करतानाही बऱ्यापैकी जातीय समीकरण काँग्रेसने साधले असल्याचे दिसून येते. या उलट उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. तब्बल ५६ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले. अनेकांनी बंडाचे निशान फडकावले आहे, त्यावरून ३८ पदाधिकाऱ्यांचे निलंबनही भाजपने केले आहे.

माजी महापौर अर्चना डेहणकर यांच्या पतीने बंडखोरी केली आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. अनेक भागात उमेदवार देताना प्रभागाच्या रचनेचा विचार केला नाही. जातीय समीकरण राखले नाही, ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आहे. अनेकजण उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. याचा फटका भाजपला बसणार असल्याचे दिसून येते.

याशिवाय राज्यात सत्तेत असलेली महायुती नागपूर महापालिकेत वेगवेगळी लढत आहे, त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या संख्येकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज बाईक रॅलीनंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मनात महायुतीच असल्याचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT