Yavatmal District BJP Political News : तीन महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी दोन नेत्यांची नियुक्ती केली. संघटनात्मक बांधणीसाठी त्यांना सर्व अधिकार बहाल केले. ते दोन्ही जिल्हाध्यक्ष संघटनात्मक बांधणीसाठी कामाला लागले. नूतन जिल्हा कार्यकारिणीची यादी दोन्ही जिल्हाध्यक्ष गेल्या अनेक दिवसांपासून खिशात घेऊन फिरत आहेत. (Not found time, two new district presidents are helpless infront of powerful leader)
मात्र, एका स्थानिक वजनदार नेत्यापुढे त्यांचे काहीच चालले नाही. परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी त्यांना मुहूर्तच सापडला नाही. एकूणच आता भाजपची जिल्हा कार्यकारिणी ‘तीन तिघाड्या’त अडकून पडल्याचे कार्यकर्त्यांकडूनच बोलले जात आहे.
जिल्हाध्यक्ष कुणीही असो नेहमीच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक आणि अन्य बाबींवर स्थानिक हेविवेट आमदार मदन येरावार यांचेच वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी त्यांच्या मर्जीतील पदाधिकारी नितीन भुतडा हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षांबरोबर जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रदेश भाजपने अनेक संघटनात्मक फेरबदल राज्यात केले. त्याला यवतमाळ जिल्हासुद्धा अपवाद राहिला नाही.
अनेक राजकीय घडामोडी घडून नितीन भुतडा यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला सारले गेले. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मकदृष्ट्या यवतमाळ जिल्ह्याचे दोन भागांत विभाजन केले. त्यामध्ये एका भागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आक्रमक नेतृत्व महादेव सुपारे, तर दुसऱ्या भागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून वणीचे माजी नगराध्यक्ष आणि युवा नेतृत्व तारेंद्र बोर्डे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली.
त्यांना लवकरच जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला आजघडीला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. मात्र, त्यांना अद्यापही जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. वास्तविक नियुक्ती झाल्याबरोबर परफॉर्मन्स दाखविण्यासाठी दोन्ही जिल्हाध्यक्ष संघटनात्मक बांधणीला लागले. आपापल्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेत त्यांनी संभाव्य कार्यकारिणीची यादीसुद्धा तयार केली आहे.
मात्र, ही जिल्हा कार्यकारिणी स्थानिक हेविवेट आमदार तथा भाजपच्या वरिष्ठ स्तरावर मोठे वजन असलेले नेते मदन येरावार यांना विश्वासात न घेता घोषित करणे, हे दोन्ही जिल्हाध्यक्षांना अद्याप तरी शक्य झाले नाही. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी अनेकदा प्रयत्न करूनही आमदार येरावार यांची संमती घेण्यात त्यांना यश आले नसल्याचे सांगण्यात येते. नव्हेतर आता जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यावरून वाद शिगेला पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असले तरी जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यासाठी दोन्ही जिल्हाध्यक्षांना केव्हा मुहूर्त सापडतो, की दिवसागणिक हा वाद वाढून त्याचा भडका उडतो, हे येणारी वेळच ठरवेल.
समन्वयकांचा असमन्वय कारणीभूत...
आमदार मदन येरावार यांच्या मागे स्थानिक स्तरावर आणि जिल्ह्यातील काही भागांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यामुळे साहजिकच मर्जीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारिणीत स्थान मिळावे, अशी अपेक्षा आमदार येरावार यांची आहे. तशाच अपेक्षा दोन्ही जिल्हाध्यक्षांकडून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहेत. नेमक्या याच कारणांमुळे कार्यकारिणीतील नावांवर एकमत होत नाही. शिवाय समन्वयकांचा असमन्वयदेखील त्याला कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश भाजपला वरिष्ठ स्तराहून 'मिशन ४५ प्लस' असे लक्ष्य म्हणजेच लोकसभेचे ४५ च्या वर उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट वरिष्ठ स्तराहून दिल्या गेले आहे. जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर- आर्णी आणि यवतमाळ-नांदेड-हिंगोली आदींचा समावेश आहे.
हे तिन्ही लोकसभा मतदारसंघ निर्णायक आहेत. त्यामुळे हे तिन्ही मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी आतापासून बांधणी करावी लागणार आहे. मात्र, जिल्हा कार्यकारिणीलाच मुहूर्त मिळत नसल्याने ४५ प्लसमध्ये जिल्हा भाजपचे योगदान दिवास्वप्न ठरू नये, असेही आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.