Rescue Operation at Vainganga River Chandrapur. Sandip Raipure
विदर्भ

Gadchiroli : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, प्रशासनाची हलगर्जी बेतली गणपुरातील महिलांच्या जीवावर!

Inexcusable Negligence : इतके स्वस्त झाले का आमचे प्राण; संतप्त कुटुंबांचा आक्रोश

संदीप रायपूरे

Chandrapur : चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला वैनगंगेचे मोठ वरदान लाभले आहे. पण हीच नदी प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवावर उठली आहे. मंगळवारी (ता. 23) गणपूरवरून गंगापूर टोक येथे कापूसवेचणीसाठी जात असलेल्या डोंगा उलटला अन् होत्याचे नव्हते झाले.

डोंग्यामध्ये असलेले सहा जण नदीत बुडाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळाले. या घटनेनंतर आता गणपूर व गंगापूर टोकसह परिसरातील नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. वैनगंगा नदीवर पूल असता तर हा दुर्दैवी प्रकार घडला नसता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गणपुरातील नागरिकांमध्ये यामुळे मोठा आक्रोश आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना आजही विदर्भातील अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत, पिण्याचे पाणी, वीज, मूलभूत सुविधा, आरोग्यव्यवस्था, नद्यांवर पूल नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या व्यथा, वेदनांचा सामना करीत जीवन जगावे लागते. शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे, प्रशासनाही हलगर्जीपणा आहे. अशाच अनास्थेतून गंगापूर टोक येथील भीषण घटना घडली आहे.

गणपूर कुणबी व केवट समाजबहुल गाव. शेती, शेतमजुरीची कामे अन् मासे पकडून येथील गरीब नागरिक आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा चालवितात. वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र त्यांच्यासाठी जीवनदायिनीच. पण आज हेच पात्र त्यांच्यासाठी मृत्यूचे द्वार ठरले. मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी भोजन केल्यानंतर गंगापूर टोक येथील गणपुरातील सात महिला नावाड्यासह कामाला निघाल्या. डोंग्यातून त्यांचा प्रवास सुरू झाला. तो त्यांचा आयुष्याचाअखेरचाच प्रवास ठरला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वैनगंगेचे अर्धे नदीपात्र गाठल्यानंतर दोनपैकी एक डोंगा उलटला. जो तो आपला जीव वाचविण्याचा आटापिटा करीत होता. पण सहा महिला नदीपात्रात बुडाल्या. अथक परिश्रमानंतर नावाडी व एक महिला बचावले. यातील दोघांचे मृतदेह हाती लागले. आता संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नदीत नाव उलटल्यानंतर प्रशासनाचे अनेक अधिकारी गावात आले. त्यांनी आपल्या स्तरावर शोधमोहीम हाती घेतली. पण फायदा झाला नाही. तोवर बराच उशीर झाला होता. चंद्रपुरातील या घटनेमुळे राजकीय व प्रशासकीय यंत्रणेबद्दल संतापाची लाट उसळली आहे.

एकही नेता फिरकला नाही

वैनगंगेत नाव उलटल्याने अनेक महिला बेपत्ता झाल्याची बातमी देशभरात पसरली. परंतु गडचिरोली व चंद्रपुरातील कोणत्याही राजकीय पक्षाचा एकही नेता घटनास्थळाकडे फिरकला नाही किंवा त्याने फोनही केला नाही. अधिकारी आणि बचावपथक तेवढे झुंज देत होते.

इतिहासाची पुनरावृत्ती

गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा वैनगंगा नदी विभागते. गावातील लोकांना प्रवासासाठी पूल नसल्याने ते डोंग्यातूनच वैनगंगेचे पात्र ओलांडतात. साधारणत 15 वर्षांपूर्वी घाटकूळ येथे डोंगा उलटला होता. त्यात 12 लोकांचा बळी गेला होता. तेव्हा नदीवरील पुलाचा विषय चांगलाच गाजला होता. त्यानंतर मोठा पूल बांधण्यात आला. कदाचित प्रशासन व शासकीय यंत्रणा असाच एक नवीन पूल बांधण्यासाठी गणपुरातील घटनेची तर प्रतीक्षा करीत नव्हते ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT