Buldhana CEO : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विशाल नरवाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारताच शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे. नरवाडे यांनी रुजू होताच घेतलेल्या नव्या निर्णयाची चर्चा सध्या होत आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी आणि अधिकारी वेळेवर येत नसल्याचे नव्या सीईओंच्या लक्षात आले. त्यामुळे सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलीच अद्दल घडविली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार हे 09.50 वाजता बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे लेटलतिफ अधिकारी व कर्मचारी बाहेरच अडकत आहेत. तीनदा विलंबाने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिला आहे.
सीईओंच्या निर्णयामुळे लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी येण्याची वेळ व कार्यालय सोडण्याची वेळ ही निश्चित आहे. अनेक कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी हे उशिरा कार्यालयात येतात. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदेत लेटलतिफ कर्मचारी मोठ्या प्रमाणात आढळतात.
राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर बदललेल्या वेळेनुसार जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ ही सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 आहे. वेळ बदलली तरी अनेक कर्मचारी बदललेल्या वेळेनुसार कार्यालयात हजर होत नाहीत. असाच प्रकार बुलडाणा येथील जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. काही अधिकारी आणि कर्मचारी सतत उशिराने येत असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या. मात्र, कारवाई होत नव्हती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशात मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची नुकतीच बदली झाल्यानंतर बुलडाणा येथे कोण येणार हा प्रश्न होता. राज्य सरकारने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विशाल नरवाडे यांची नियुक्ती केली. विशाल नरवाडे यांनी पदभार स्वीकारतच घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाचे सध्या स्वागत होत आहे. जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे उशिरा येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अनोख्या पद्धतीने या लेटलतिफांना अद्दल घडविण्याचे ठरविले.
पहिल्याच दिवशी कार्यालयात उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना धडा शिकवला. त्यांनी कार्यालयाच्या मुख्य गेटला कुलूप लावून 23 लेटलतिफ कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास बाहेर ताटकळत ठेवले. अनेक कर्मचारी सकाळी 11 वाजेपर्यंत, तर कुणी 12 वाजेपर्यंत आपल्या मनमर्जीने कार्यालयात येतात. उशिरा येण्याचा हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, नरवाडे यांनी या प्रकाराला गांभीर्याने घेत सकाळी 09.50 वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे चॅनलगेट बंद करण्याचे आदेश दिलेत. ‘मन राजा मन प्रजा’ असे वागणाऱ्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांना आयएएस विशाल नरवाडे यांनी दणका दिल्याचे दिसून येत आहे.
रुजू झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे चॅनलगेट बंद करण्यात येत आहे. त्यामुळे लेटलतीफ अधिकारी व कर्मचारी बाहेरच अडकत आहेत. तीनदा उशिरा अधिकारी कर्मचारी आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी विशाल नरवाडेंनी दिला आहे.
विशाल नरवाडे हे 2019 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी कळवण येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. कठोर शिस्तीचे तरुण अधिकारी म्हणून त्यांची प्रशासकीय सेवेत ओळख आहे. विशेष म्हणजे विशाल नरवाडे हे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. धाडनजीकच्या सावळी गावातील ते मूळ रहिवासी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते बदली झाल्यानंतर राज्य सरकारने विशाल नरवाडे यांना येथे संधी दिली आहे. नरवाडे यांना यानिमित्ताने ‘होम डिस्ट्रिक्ट’ मिळाले आहे. विशाल नरवाडे यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ पार पडताच त्यांनी बुलडाणा सीईओचा पदभार स्वीकारला. स्वतःचा जिल्हा असल्याने बुलडाणा जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराला ते आता चांगलेच वळण लावतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.