Lok Sabha Election Bhandara. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : पक्षश्रेष्ठींची लागणार कसोटी, कोणाला मिळणार तिकीट?

अभिजीत घोरमारे

Political Campaigning : नव्या वर्षाचा जानेवारी महिना उगवताच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी राजकीय नेतेमंडळींसह पक्ष आणि इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीला चार महिन्यांचा अवकाश असला तरी उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वारे वेगात वाहत आहेत.

सर्वच पक्षांनी बुथ सक्षमीकरणावर भर देणे सुरू केले आहे. मागील दोन महिन्यांपासून जनसंपर्क यात्रा, प्रचारदौरे मतदारसंघात सुरू झाले आहेत. चार महिन्यांवर निवडणूक आली असताना आता ही तयारी जोमाने करण्यात येत आहे. रथयात्रा, जनसंपर्क यात्रा, मोर्चे, पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे या माध्यमातून पक्षीय व्यासपीठावरून नेतेमंडळी जनतेशी संपर्क साधत आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या इतिहासावर लक्ष घातल्यास भाजपनेच बाजी मारली आहे, यात 1999 मध्ये भाजपचे चुन्नीलाल ठाकूर, 2004 मध्ये भाजपचे शिशुपाल पटले, 2014 मध्ये भाजप तिकिटावर नाना पटोले विजयी झाले. 2019 मध्ये सुनील मेंढे निवडून आले. केवळ 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी बाजी मारली.

दोन टर्मपासून लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आला आहे. 2014 मध्ये निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर नाना पटोले निवडून आले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे पोटनिवडणुकीत निवडून आले होते. 2019 मध्ये भाजपचे सुनील मेंढे यांनी हा गड आपल्याकडे खेचला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षनिहाय तयारीचा आढावा घेतला असता यात भाजप आघाडीवर आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपकडे आला. त्यामुळे यावेळीही भाजपचा या जागेसाठी दावा आहे. विद्यमान खासदारांनी त्यासाठी तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही सरसावला आहे. पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यात शरद पवार यांना या मतदारसंघाबाबत चिंता आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. त्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर दावा सांगणे सुरू केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही तयारीत आहे. अजित पवार गटाचे गोंदिया हे विदर्भातील मुख्य केंद्र मानले जाते. त्यामुळे सर्वांच्या नजरा येथील घडामोडींवर लागल्या आहेत. अजित पवार गटानेही भंडारा-गोंदियाच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. यासंदर्भात महायुतीमध्ये ठरणारा निर्णय महत्त्वाचा असेल. काँग्रेस पक्षही या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत आहे. मात्र काँग्रेसची भूमिका सावध आहे.

महाविकास आघाडीमध्ये नेमके काय ठरणार, यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसकडून या जागेवर दावा केला जात असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात भंडारा-गोंदियाची जागा आधीपासूनच आहे. त्यामुळे महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी ओढाताण दिसत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT