BJP infighting Chandrapur : आजवर काँग्रेसमध्ये गटबाजी तर भाजपमध्ये एकी असे, चित्र निवडणुकांमध्ये दिसायचे. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र उलट झाले आहे. काँग्रेसमधील मतभेद दूर झाले आहे तर, भाजपचे गटबाजी उफाळून आली आहे. नगर पालिका निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर एकत्रित आले आहेत. त्यांनी बैठकीही घेतली. महाविकास आघाडी एकत्र राहील असे प्रयत्न त्यांच्या मार्फत सुरू आहेत. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले आहे.
बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, राजुरा, मूल, गडचांदूर, चिमूर, नागभीड, घुग्गुस या नगर परिषदा आणि भिसी नगरपंचायतीमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. भाजपचे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात निवडणूक प्रमुख म्हणून गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांची नियुक्ती केली आहे. तर चंद्रपूरमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून जोरगेवार यांची नियुक्ती केली. बिहार निवडणुकीच्या प्रचारात असल्याने मुनगंटीवारांवर जबाबादारी सोपवण्यात आली नसल्याचा दावा भाजपच्यावतीने (BJP) केला जात आहे. पण ही बाब अद्याप कोणालाही रुचलेली नाही. हे बघनाही. यावरून भाजपमध्ये टोकाचे मतभेद उफाळून आले असल्याचे स्पष्ट होते.
विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपसातील मतभेद दूर ठेवून नुकतीच एक बैठक घेतली. निवड मंडळाची ही बैठक होती. यात निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. वडेट्टीवार आणि धानोरकर एकत्र असणे, याला काँग्रेसमध्ये फार महत्त्व आहे. सध्यातरी काँग्रेसमध्ये गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे.
याशिवाय मित्रपक्षांशी बोलणी करून आघाडी करण्याचा विचारही केला जात आहे. पारंपरिक विरोधक असलेल्या शेतकरी संघटनेलाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाले तर काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो. ठाकरे सेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने अजून भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे आघाडीबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. परंतु, वडेट्टीवार यांनी मित्रपक्षांची मोट बांधण्याची जबाबदारी घेतली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार भाजपचे आहेत. मुनगंटीवार यांच्यासारखे अनुभवी नेते असणे, ही पक्षाची जमेची बाजू आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने उमेदवारांची संख्या मोठी राहणार आहे. एकच ठिकाणी अनेकांचा दावा असल्याने उमेदवारी कुणाला द्यावी, हा मोठा प्रश्न आहे. यातून मार्ग काढण्यात पक्षाला अपयश आल्यास नाराजीचा फटका बसू शकतो.
पाचपैकी तीन आमदार मुनगंटीवार यांच्या विरोधात असल्याने उमेदवार निवडीचे अधिकार कुणाला मिळतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमध्ये पहिल्यांदाच गटबाजी बघायला मिळत आहे. या गटबाजीवर पक्ष काय तोडगा काढतो, यावरही बरेच अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.