Political Consensus in Chandrapur District Bank Elections - भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार तसेच भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांनी पुढाकार घेतल्यामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध निवडून आल्या. याशिवाय मुनगंटीवार आणि जोरगेवार यांनी चाचपणी करून आधीच तटस्थ भूमिका घेतल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून उद्भवणारा राजकीय संघर्ष टळला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालकांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यापैकी १२ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित आठपैकी एक उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याने त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणावर न्यायालयाचा निकाल आलेला नाही. त्यामुळे एका जागेची निवडणूक स्थगिती ठेवण्यात आली आहे. म्हणून आता फक्त सात संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीत भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांची भूमिका महत्त्वाची ठरली. निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या वडेट्टीवार यांच्या समर्थकांचा त्यांनी आधीच भाजप प्रवेश करून घेतला होता. त्यामुळे वडेट्टीवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महिला गटातील भाजपच्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी बंटी भांगडिया यांना तडजोड करावी लागली. त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांची बिनविरोध निवड झाली.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. भाजपचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण अध्यक्षांच्या नियुक्तीवरून त्यांच्यातील वाद विकोपाल गेले होते. भाजप चंद्रपूर शहर अध्यक्ष जोरगेवार तर ग्रामीणमध्ये मुनगंटीवार यांच्या पसंतीची अध्यक्ष देऊन पक्षाने त्यांच्या वादाला अल्पविराम दिला.
त्यानंतर बँकेच्या निवडणुकीत दोघांचे गट आमनेसामाने येतील अशी शक्यता वर्तविली जात होती. दुसरीकडे खासदार धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात लोकसभेच्या निवडणुकीपासून मतभेद उफाळले होते. दोन्ही नेत्यांच्या जाहीर वक्तव्यामुळे त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर दोघांनी शांतता बाळगली आहे. आता वडेट्टीवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याने वादाची ठिगणी पडण्याची शक्यता दिसत नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.