Sudhir Mungantiwar, Vijay Wadettiwar, Shivani Wadettiwar and Pratibha Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Lok Sabha Constituency : काँग्रेस लाथाळ्या पडताहेत भाजपच्या पथ्थ्यावर !

Congrss Leaders : चंद्रपुरातील लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांची नावे चर्चेत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur Lok Sabha Constituency : काँग्रेस नेत्यांनी एकदिलाने आजही मनावर घेतले तर ते कुणालाही तगडी टक्कर देऊ शकतात. पण अंतर्गत लाथाळ्या नेहमीच काँग्रेसला मारक ठरल्या आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आजही काँग्रेसचे तेच सुरू आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी घोषितही झाली, चंद्रपूरपासून वणी, आर्णीपर्यंत भाजपचे नेते, कार्यकर्ते कामालाही लागले. पण काँग्रेस नेते मात्र नेहमीप्रमाणे वादातच अकडलेले आहेत.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अद्यापही उमेदवार निश्चित करू शकलेली नाही. अद्यापही काँग्रेसचे या मतदारसंघाबाबत तळ्यातमळ्यातच सुरू आहे. इकडे नावाची घोषणा होताच मुनगंटीवार यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये बिघाडी असल्याने भाजपने काँग्रेसला प्रचाराच्या बाबतीत केव्हाच ‘ओव्हरटेक’ केले आहे. अशात काँग्रेसमध्ये अद्यापही उमेदवारीसाठी काटछाट सुरू आहे.

चंद्रपुरातील लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठी अद्यापही या तीनपैकी कोणत्याही एका नावावर ठाम मत तयार करू शकलेले नाहीत. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असले तरी त्यांना लोकसभा निवडणुकीत कोणताही रस नाही. त्यांना महाराष्ट्रातील राजकारणातच कायम राहायचे आहे. त्यामुळे त्यांनी आपली कन्या शिवानी यांच्यासाठी जोर लावणे कायम ठेवले आहे. विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारीसाठी नकार दिल्यास शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर याच दोघी स्पर्धेत राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या रस्सीखेचीमुळे पक्षाचा उमेदवार निश्चित होईल केव्हा व तो प्रचार करेल केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याउलट भाजपचे चित्र पूर्णपणे स्वच्छ असल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, वणी, आर्णी येथे जोरात प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. आमदार, अर्थमंत्री, वनमंत्री आणि आता पुन्हा वनमंत्री असताना मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली जात आहे.

काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे मुनगंटीवारांचे काम सोपे झाले आहे. चंद्रपूरसाठी मुनगंटीवार यांनी काय केले, हे तेथील जनतेला पूर्णपणे ठाऊक आहे. त्यामुळे भाजपने आता वणी, आर्णी या भागात जास्त जोर लावला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. मात्र, भाजप वगळता कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा पत्ता नसल्याचे चित्र आहे.

सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने पहिल्याच यादीत तिकीट दिले आणि त्यांनी प्रचाराची सुरुवातही केली. इतक्या मोठ्या तगड्या उमेदवारापुढे इतर पक्षांना उमेदवार देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काँग्रेसमधील गटबाजी, तिकिटासाठीची भांडणे आणि उमेदवार निवडीबाबतचे मतभेद यामुळे ते मागे पडत असल्याचे दिसत आहे. याचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT