Chandrapur Lok sabha Election 2024: चंद्रपुर लोकसभेची (Chandrapur Lok Sabha) जागा जिंकण्यासाठी भाजपने आपल्याकडचा हुकमी एक्का अर्थात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलं आहे. मात्र, ही जागा राखून भाजपला (BJP) शह देण्याऐवजी काँग्रेसमधील इच्छुक आपापसात भांडताना दिसत आहेत. चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यातच उमेदवारीचा संघर्ष पेटला असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोघात घमासान सुरू आहे. अशातच मागील निवडणुकीत धानोरकरांना निवडून आणण्याचा शब्द काँग्रेस नेते राहुल गांधींच्या डोळ्यांदेखत दिल्याच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप वडेट्टीवार समर्थकांनी बाहेर काढली आहे. एवढेच नव्हे तर बाळू धानोरकरांचे जुने भाषण सोशल मीडियावर आणून वडेट्टीवर हे शब्दाचे कसे पक्के आहेत असे दाखवून देण्याचा प्रयत्नही त्यांचे समर्थक करीत आहेत. दुसरीकडे धानोरकर यांच्या पत्नी आणि आमदार प्रतिभा धानोरकरदेखील आपला आक्रमक पवित्रा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्येच निवडणुकीआधीच शक्तीपाताचा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर लोकसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा प्रचार, जनसंपर्क सुरू झाला आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळच अद्याप मिटलेला नाही. काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांपैकी एकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होताच, वडेट्टीवारांच्या विरोधात एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे. या पत्रातून वडट्टीवारांना थेट 'चुकीला माफी नाही' इशारा देण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पत्रात लिहिलं आहे, 'विदर्भातील कुणबी समाजाने वडेट्टीवार यांना पाठिंबा दिला आहे. पण गेल्या काही महिन्यांत याच कुणबी समाजातील एका विधवा महिला लोकप्रतिनिधीच्या हक्काच्या जागेवर वडेट्टीवार राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. हक्काच्या जागेवर पोळी भाजली तर चुकीला माफी नाही,' असा इशाराच या पत्रातून विजय वडेट्टीवार यांना देण्यात आला आहे.
वडेट्टीवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्राला उत्तर देण्यासाठी वडेट्टीवार समर्थकांनी काही व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये वडेट्टीवार दिवंगत काँग्रेसचे (Congress) उमेदवार बाळू धानोरकर यांना निवडून आणणार असल्याचे वचन राहुल गांधी यांना देताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वडेट्टीवार समर्थकांनी लिहिलं आहे. "स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे कुणबी समाजातील उमेदवार होते, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला होता आणि निवडणूक प्रचारात 50 हून अधिक सभा घेतल्या होत्या. आणि आज वडेट्टीवार कुणबी विरोधक आहेत म्हणून प्रचार सुरू आहे?" असा प्रश्न वडेट्टीवार समर्थकांनी उपस्थित केला आहे.
व्हायरल व्हिडिओ -
R
तसेच आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. ज्यामध्ये धानोरकर म्हणतात, 'विजय वडेट्टीवार यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींजवळ आपल्या उमेदवारीसाठी विनंती केल्यामुळे मी खासदार म्हणून निवडून आलो,' या व्हिडिओच्या माध्यमातून वडेट्टीवारांनी बाळू धानोरकरांच्या उमेदवारीसाठी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी किती प्रयत्न केले होते, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ते कुणबी समाजाच्या विरोधात नाहीत हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
(Edited By - Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.