
Lok Sabha Election News: महाविकास आघाडीतील (MVA) मित्रपक्षांमध्ये 4 जागांवरून वाद सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ( Sharad Pawar ) पक्षाकडून काँग्रेसची कोंडी केली जात आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वारंवार होत असलेल्या बैठकांना काँग्रेस कंटाळली आहे. रोज-रोज त्याच चर्चा सुरू आहेत. अशातच ठाकरे-पवार गटाने जास्त ताणण्याची भूमिका घेतल्यास या जागांबाबत काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची तयारी करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी, रामटेक आणि मुंबईतील दोन जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आणि शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाकडून दावा केला जात आहे. या जागांबाबत दोन्ही गट आक्रमक आहेत. त्यामुळे काँग्रेस (Congress) हतबल झाली असतानाच उद्धव ठाकरे यांनी काल सांगलीतून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांचे नाव जाहीर केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विशाल पाटील हेच उमेदवार असतील, असे म्हटले आहे. त्यामुळे सांगलीतील जागावाटपाचा तिढा वाढला आहे. याच जागांचा तिढा सोडवण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. परंतु आता या बैठकांना काँग्रेस कंटाळली आहे. 'रोज तेच दळण दळत बसायचे, मग भाकरी कधी करणार?,' असा प्रश्न काँग्रेसकडून विचारला जाऊ लागला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगलीची (Sangli) जागा काँग्रेस सोडायला तयार नाही. सांगलीतील जागेबाबतचा वाद कमी न झाल्यास काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची तयारी करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. कोल्हापूरची (Kolhapur) जागा काँग्रेसला दिल्याने शिवसेनेने सांगलीवर दावा सांगितला आहे. परंतु सांगलीत शिवसेनेचा साधा एक नगरसेवक नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने येथे काँग्रेस तडजोड करायला तयार नाही.
मुंबईतील (Mumbai) उत्तर-मध्य आणि उत्तर मुंबई या 2 जागा काँग्रेसला सोडण्यात येणार आहेत. शिवसेना 4 जागा लढवणार आहे. काँग्रेसने दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई या पैकी एक मतदारसंघ मागितला आहे. परंतु शिवसेना दक्षिण-मध्य मुंबई सोडायला तयार नाही. ईशान्य मुंबईच्या बदल्यात शिवसेना रामटेकवर दावा सांगत आहे. या मतदारसंघावरून शिवसेना आणि काँग्रेसमधला वाद वाढायला सुरुवात झाली आहे. तसेच काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्यातदेखील भिवंडी, अमरावती आणि वर्धा मतदारसंघांवरून वाद सुरू आहे. काँग्रेसने अमरावतीसाठी वर्धा मतदारसंघावरील दावा सोडला आहे. परंतु भिवंडीवरील दावा राष्ट्रवादी सोडण्यास तयार नाही.
महाविकास आघाडीतील (MVA) जागावाटपाच्या विलंबाबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे आणि पवार गटाने जागावाटप ताणून धरल्यास पर्यायी चूल मांडण्याची ताकद ठेवल्याचा काँग्रेसने दावा केला आहे. वारंवार बैठका घेऊन हा तिढा अधिकच वाढत चालला आहे. पुढे संघर्ष तीव्र आहे. हुकूमशाहीला रोखण्यासाठी आघाडीत समन्वय गरजेचा आहे. बैठका घेऊन त्यात जास्त वेळ जात आहे. या बैठकांच्या सत्राला काँग्रेस वैतागली आहे. लवकरात लवकर मार्ग काढून निवडणुकीच्या मैदानात महाविकास आघाडीचे नेते असायला पाहिजेत, असेही मत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे.
सांगलीच्या जागेबाबत उद्धव ठाकरे हे घाई करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल चंद्रहार पाटील यांना उमेदवार जाहीर केलं. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, काँग्रेसनेदेखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.