Devendra Fadanvis, Sudhir Mungantiwar, Dr. Babanrao Taywade, Kishor Jorgewar and Others Sarkarnama
विदर्भ

Chandrapur OBCs Fasting : चंद्रपुरातील ओबीसींचे उपोषण सुटले; फडणवीसांनी आंदोलनकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला !

संदीप रायपूरे

Chandrapur District Political News : ११ सप्टेंबरपासून ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू होते. काल (ता. २९) मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर ओबीसीचे शिष्टमंडळ व सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर आज (ता. ३०) सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात दाखल झाले आणि आंदोलनकर्त्यांना लिंबू सरबत पाजून उपोषण सोडवले. (As soon as the fast ended, slogans of 'Jai OBC' were raised in the mandap area)

ओबीसींच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्याचे फडणवीसांनी या वेळी सांगितले. उपोषण सुटताच मंडप परिसरात ‘जय ओबीसी’चे नारे लावण्यात आले. ओबीसीची जातिनिहाय जनगणना करावी, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, ओबीसीची ७२ वसतिगृह तातडीने सुरू करावीत, स्वाधार योजनेची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी ओबीसी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलनास बसले होते.

त्यांच्या आंदोलनाचा मोठा पाठिंबा मिळाला. चंद्रपुरात महामोर्चा काढण्यात आला, मुंडन व भीक मांगो आंदोलन करण्यात आले. संतप्त ओबीसींनी चंद्रपूर-नागपूर महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध प्रकारचे आंदोलन करूनही शासनाचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी चंद्रपुरातील नेत्यांच्या घरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढली.

दरम्यान, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. पण त्यांची शिष्टाई कामी आली नाही. टोंगेंची तब्येत बिघडल्यानंतर इतर दोघांनी अन्नत्याग आंदोलनाचा भार आपल्या खांद्यावर घेतला. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन ओबीसी आंदोलनाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे सांगितले होते.

ओबीसींच्या विविध समस्यांसंदर्भात काल (ता. २९) सरकार व ओबीसींच्या प्रतिनिधींची बैठक मुंबईत झाली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच चंद्रपुरात दाखल झाले. मुंबईत झालेल्या चर्चेनुसार ओबीसींच्या विविध मागण्या मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार कुठल्याही स्थितीत मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज व ओबीसी समाजात कुठलाही वाद होणार नाही, याची काळजी सरकार घेणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार किर्तीकुमार भांगडीया व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी अन्नत्याग करणाऱ्या रवींद्र टोंगे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना लिंबू सरबत पाजून फडणवीस यांनी उपोषण सोडवले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, अशोक डहाके यांच्यासह इतर पदाधिकारी ओबीसींच्या विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, तब्येतीची काळजी घ्या...

ओबीसीचे आंदोलन सोडविण्यासाठी आज (ता. २९) सकाळी सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात दाखल झाले. आंदोलन सोडविल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांना तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला दिला. समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी टोंगेंनी सतत १९ दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. ही बाब महत्त्वाची असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT