Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : महायुतीत सर्व ‘ओके’; 80 टक्के जागावाटपाचे काम पूर्ण

Chandrashekhar Bawankule : विरोधी पक्ष केवळ संभ्रम पसरवित असल्याची केली टीका. दिल्लीतील बैठकीत होणार इतर जागांबाबत निर्णय.

Atul Mehere

Lok Sabha Election 2024 : महायुतीमधील मित्रपक्षात जागावाटपाबाबत कोणताही तिढा नाही. महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद कायम असताना महायुतीमध्ये 80 टक्के जागावाटप झाल्याचे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंदशेखर बावनकुळे यांनी केले आहे. बावनकुळे यांनी नागपुरात बोलताना ही माहिती दिली. उर्वरित काही जागांसाठी दिल्लीत बैठक होत असून, एक ते दोन दिवसांत इतर जागांचा निर्णय होईल, असे संकेतही बावनकुळे यांनी दिले आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून कोणताही तणाव नसल्याचे ते म्हणाले. महायुतीपेक्षा विरोधी पक्षात जास्त तणाव आहे. महायुतीमध्ये तणाव असल्याचा संभ्रम विरोधक पसरवित असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. महायुतीमधील जागावाटपाबाबत बावनकुळे यांनी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होतील. त्यानंतर जागांच्या ‘फाॅम्युला’बाबत कळवू, असे वक्तव्य केले.

बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. पवारांना ईडीची भीती वाटत असल्याचे ते म्हणाले. ईडीने कारवाईला सुरुवात केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून ओरड सुरू झाली आहे. यावर बावनकुळे म्हणाले, शरद पवारांना जर कर असेल तर त्यांना डर कशाला वाटत आहे? ईडीची नोटीस आली असेल, तर त्याला त्यांनी साधेपणाने उत्तर द्यावे. शरद पवार चौकशीला इतके का घाबरत आहेत? असेही बावनकुळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे आता राज्यभर फिरत आहेत. मुख्यमंत्री असताना ठाकरे फिरले असते तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी कधी विदर्भाचा दौरा केला नाही. विदर्भाचे प्रश्न सोडविले नाहीत. हे केले असते त त्याचा फायदा त्यांना आता झाला असता. कोविडमध्ये देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना हॉस्पिटलमध्ये फिरत होते. उद्धव ठाकरे घरात बसून होते. आता पद निघून गेल्यानंतर ते गावभर फिरत असल्याची खोचक टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आणि भाजपची भूमिका विसंगत नाही, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावर नागपूर येथे बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे भाजपचे मित्र आहेत. राज यांची ध्येयधोरणे पाहता आम्ही एकत्र आलो तर त्यात वावगे नाहीच नाही. येणारी लोकसभा निवडणूक महायुती नक्कीच जिंकेल. देशातील जनतेचा नरेंद्र मोदी या नावावर विश्वास आहे. त्यांना मोदींच्या गॅरंटीची गॅरंटी आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वच निवडणुकीत विरोधकांचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. मतदार सूज्ञ आहेत. त्यामुळे ते अहंकारी विरोधकांना धडा शिकवतील, असा ठाम विश्वासही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT