Nagpur News: नगरपालिका आणि नगर परिषदेची निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षांनी बोलावलेली बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwadhan Sapkal) यांनी अवैध ठरवली होती. या मुलाखतीच्या कार्यक्रमातून निवडमंडळाच्या प्रतिनिधींनी डावलण्यात आले होते.
आता जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांना बुधवारी (ता.11) पुन्हा बैठक बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय पक्षाने नियुक्त केलेल्या निवड मंडळाच्या प्रतिनिधींना सन्मानाने बोलवावे असेही प्रदेशाध्यक्षांनी बजावले आहे. यावरून केदार समर्थकांनी घेतलेल्या मुलाखतीसुद्धा अवैध ठरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या पुढाकाराने इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आश्विन बैस यांनी जाहीर केला होता. त्यानुसार इच्छुकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. मात्र, या बैठकीची सूचना नागपूरचे निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह निवड मंडळाच्या इतर सदस्यांना देण्यात आली नव्हती.
याशिवाय पक्षाच्या प्रोटकॉलनुसार वरिष्ठ पदाधिकारी, माजी आमदार, पदाधिकारी, माजी अध्यक्ष तसेच पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेमलेल्या जिल्हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीला बोलावले नव्हते. फक्त सुनील केदार, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक या मोजक्याच तसेच केदारांच्या समर्थकांनाच बोलावून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
याची माहिती मिळताच काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली. त्यांनी याची तत्काळ दखल घेतली. त्यांनी तातडीने नागपूर ग्रामीणचे निरीक्षक वीरेंद्र जगताप यांच्यासोबत उदय मेघे आणि अशोकराव बोबडे यांना नागपूरला पाठवले. त्यांनी ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत येऊन ही बैठक अवैध असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
सोबतच अशा परस्पर, नियमबाह्य बैठका घेऊन गटबाजीला खतपाणी घालू नका, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलू नका हा अध्यक्षांचा निरोपही बैठकीत उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांना कळविला.
यानंतरही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मुलाखतीला आलेल्या उमेदवारांची नाराज होऊ नये असे कारण पुढे करण्यात आले होते. आता प्रदेशाध्यक्षांनी बैठकीसोबतच सर्व मुलाखतीसुद्धा अवैध ठरवल्याचे नव्याने काढण्यात आलेल्या आदेशावरून स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.