Congress  Sarkarnama
विदर्भ

Congress Politics : आघाडीत ठिणगी! पूर्व विदर्भातील सर्व जागांवर काँग्रेसचा दावा; घटक पक्षांची भूमिका काय?

East Vidarbh Congress : काँग्रस हायकमांडकडे जाणार निर्णय...

अभिजीत घोरमारे

Maharashtra Political News : पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदियासह सर्व सहा लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा ठोकला आहे. या सर्व जागांवर काँग्रेसचा उमेदवार लढणार, असा निर्धार शनिवारी गडचिरोलीतील विभागीय मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. ही भावना दिल्लीत हायकमांडपर्यंत पोहोचवणार असल्याचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पूर्व विदर्भावरील काँग्रेसच्या दावेदारीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांत नाराजीचे वातावरण पसरले आहे.

बैठकीत पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया-भंडारा हे मतदारसंघ इंडिया आघाडीत काँग्रेससाठी सोडवून घेण्याची आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. काँग्रेसने पाचही मतदारसंघांत केलेल्या तयारीचा आढावा घेऊन चेन्नीथला यांनी पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी बंद सभागृहात संवाद साधला. त्यानुसार चेन्नीथला यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या भावना दिल्लीत सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवून इंडिया आघाडीच्या वाटाघाटीत या जागा काँग्रेसकडेच राहतील, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सहप्रभारी आशीष दुआ, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, अनिस अहमद, सुनील केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार सुभाष धोटे, वजाहत मिर्जा, विकास ठाकरे, प्रतिभा धानोरकर, अभिजित वंजारी, माजी खासदार मारोतराव कोवासे, दीपक काटोले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आदि उपस्थित होते.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये (MVA) लोकसभेच्या जागेच्या वाटपाबाबत ठोस निर्णय झाला नाही. आघाडीतील घटक पक्ष अनेक जागांवर दावेदारी करीत आहे. असे असताना पूर्व विदर्भातील सर्वच लोकसभा जागांवर काँग्रेसने दावेदारी केल्याने महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष नाराज होणे सहभागी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार (Sharad Pawar) गट भंडारा गोंदिया लोकसभेवर आपली अजूनही दावेदारी व्यक्त करत आहे. रोहित पवार येथून निवडणूक लढवावी तशी तयारी सुरू करण्यात आलेली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ही नागपूर लोकसभेवर आपली दावेदारी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसने पूर्व विदर्भ आपली दावेदारी करत हायजॅक केल्याने महाविकास आघाडीमध्ये मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. गडचिरोली येथे झालेल्या बैठकीत सध्या तरी हेच वाटत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT