Congress leaders releasing the Nagpur Municipal Corporation candidate list as several former corporators are denied tickets over alleged rebellion and anti-party actions. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress : विधानसभेत बंडखोरी माजी नगरसेवकांना काँग्रेसचा धक्का; चौधरी, कापसे, सहारे, भुट्टो यांना डावलले

Nagpur Congress News : नागपूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी व पक्षविरोधी कारवायांचा ठपका असलेल्या माजी नगरसेवकांना काँग्रेसने तिकीट नाकारत कडक संदेश दिला आहे.

Rajesh Charpe

Nagpur Municipal Election : विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी आणि पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका असलेल्या नगरसेवकांना यावेळी तिकीट कापून काँग्रेसने मोठा धक्का दिला. यात पूर्व नागपूरमधून बंडखोरी करणारे पुरुषोत्तम हजारे, उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून बसपाकडून लढलेले मनोज सांगोळे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मध्य नागपूर विधानसभेत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात लढणारे रमेश पुणेकर यांच्या पत्नीला मात्र उमेदवारी देण्यात आली आहे. कमलेश चौधरी यांच्यावर पक्ष विरोधी कारवायाचा ठपका ठेवून त्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. उबाठातून अलीकडेच घर वापसी केलेल्या स्थायी समितीचे माजी सभापती दीपक कापसे यांना पुन्हा डावलण्यात आले.

काँग्रेसने मंगळवारी (ता.30) सायंकाळी नागपूर महापालिकेची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात माजी नगरसेविका नेहा निकोसे, मनोज सांगोळे, संदीप सहारे, आशा उइके, झुल्फिकार भुट्टे, झिशान इरफान, उज्ज्वला बनकर, प्रणिता शहाणे, पुरुषोत्तम हजारे, साक्षी राऊत, रश्मी धुर्वे, विक्रम ग्वालवंशी, हरीश ग्वालवंशी, कमलेश चौधरी, बंटी शेळके, तानाजी वनवे, दर्शनी धवड अशा एकूण 17 माजी नगरसेवकांना डच्चू दिला.

काँग्रेसचे फक्त 29 नगरसेवक निवडून आले होते. तानाजी वनवे आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. दर्शनी धवड आणि नेहा निकोसे यांना आधीच भाजपने पळवले. बंटी शेळके यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात रमेश पुणेकर यांनी बंडखोरी केली होती. माजी नगरसेवक मनोज सांगोळे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढले होते.

त्यामुळे उत्तर नागपूरचे आमदार व माजी मंत्री नितीन राऊत यांनी त्यांना तिकीट देण्यास कडाडून विरोध केला होता. हजारे यांच्या नावाला आमदार अभिजित वंजारी आणि उमाकांत अग्निहोत्री या दोघांनीही विरोध दर्शवला. नगरसेवक कमलेश चौधरी यांना शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा विरोध होता. या तिघांनाही उमेदवारी अर्ज देण्यास आणि मुलाखतीला येण्यास काँग्रेसने विरोध केला होता.

उज्ज्वला बनकर, प्रणिता शहाणे यांच्या ऐवजी कुमुदिनी प्रफुल गुडधे यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले आहे. येथील दोनपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने दोन्ही माजी नगरसेविकांना विश्रांती घ्यावी लागली. दीपक कापसे आणि नाना झोडे हे दोन्ही माजी नगरसेवक दुष्यंत चतुर्वेदी यांच्यासोबत शिवसेनेत (Shivsena) गेले होते. आता दोघांनीही घरवापसी केली.

नाना झोडे यांना तिकीट देण्यात आले मात्र आरक्षणाची अडचण नसतानाही कापसे यांना मात्र तिकीट नाकारण्यात आले. यामुळे कापसे समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. संदीप सहारे यांना तिकिट मिळणार नाही याची कल्पना आल्याने त्यांनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Congress) जाऊन उमेदवारी दाखल केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT