NCP sharad pawar  Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar NCP: आणखी एका काँग्रेस नेत्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

किशोर गजभिये यांनी बसपातून आपला राजकीय प्रवास सुरू केला. ते उत्तर नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढले होते. त्यांच्यामुळे माजी मंत्री नितीन राऊत यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला होता. त्यांच्यामुळे उत्तर नागपूरमध्ये तिरंगी लढत झाली होती.

Rajesh Charpe

Nagpur News: सध्या महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आणि सत्ता असे संपूर्ण पॅकज महायुतीत उपलब्ध आहे. त्यामुळे आपआपली राजकीय सोय, मतदारसंघातील समिकरणे आणि विचारसणीनुसार पक्ष निवडला जात आहे. मात्र काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी यांनी किशोर गजभिये यांनी हा सोयीचा पर्याय वगळून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला.

शरद पवार बहुजन विचारसरणीचे आहेत आणि मुख्य म्हणजे या पक्षाचे हेडक्वॉर्टर मुंबईत आहे. त्यामुळे त्यांना सहज भेटता येते आणि झटपट निर्णय होतात यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसची निवड केल्याचे गजभिये यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत जावे लागते. दोनदोन दिवस भेटीसाठी ताटकळत राहावे लागते. या पक्षाचे सर्व निर्णय दिल्लीतूनच होतात. प्रत्यक्ष भेटीत जे काही ठरते त्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळेच निर्णय होतात असाही आरोप गजभिये यांचा आहे.

किशोर गजभिये यांनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. किशोर गजभिये यांनी बसपातून आपला राजकीय प्रवास सुरू केला. ते उत्तर नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढले होते. त्यांच्यामुळे माजी मंत्री नितीन राऊत यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला होता. त्यांच्यामुळे उत्तर नागपूरमध्ये तिरंगी लढत झाली होती.

राऊत आणि गजभिये यांच्या लढाईत भाजपचे डॉ. मिलिंद माने निवडून आले होते. गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती तर राऊत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. अनुसचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेकसाठी काँग्रेस चांगल्या उमेदवाराच्या शोधात होती. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व माजी केंद्रीयमंत्री मुकुल वासनिक यांनी गजभिये यांना काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला.

एवढेच नव्हे तर 2019च्या निवडणुकीत स्वतःच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसुद्धा दिली होती. मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना ही बाब खटकली. त्यांनी उघडपणे गजभिये यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. राऊत यांनी बंडखोरीचा इशाराही दिला होता तर माजी मंत्री सुनील केदार यांनी बाहेरच पार्सल आम्हाला नको असे सांगून उघड विरोध दर्शवला होता.

2024च्या निवडणुकीत रामटेकचे सर्वाधिकार काँग्रेसने केदारांना दिले होते. त्यांनी रश्मी बर्वे यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब करून ठेवले होते. नाराज झालेल्या गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशान फडकावले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीने त्यांना पाठिंबा दर्शवला होता. नंतर तो काढूनही टाकला. त्यामुळे गजभिये यांचा टिकाव लागला नाही.

पक्षाने निलंबित केल्यानंतर सहा महिन्यांपासून गजभिये कुठल्या पक्षात जावे याचा विचार करीत होते. अखेर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवड केली. गजभिये यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातही नागपूर पदवीधर मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली होती.

नागपूरमधील अंबाझरी तालवाच्या शेजारी असलेल्या आंबेडकर स्मारकासाठी त्यांनी दीर्घकाळ लढा दिला. एका खाजगी कंपनीने स्मारकाचा परिसर मनोरंजानासाठी भाडेतत्त्वावर घेतला होता. मात्र विकास कामच्या सुरुवातीलाच जीर्ण झालेले आंबेडकर स्मारक पाडण्यात आल्याने नागपूरमध्ये मोठा असंतोष उफाळला होता.

गजभिये यांच्या नेतृत्वात संबंधित कंपनीच्या विरोधात अनेक महिने सातत्याने आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे कंत्राटच रद्द केले आहे.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर गजभिये म्हणाले सध्या हा विषय जर तरचा आहे. ते एकत्र येतील किंवा नाही हे सांगता येत नाही. भविष्यात जे काही व्हायचे ते होईल तेव्हा काय निर्णय घ्यायचा हे ठरवू. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करण्याचे आपण ठरवले आहे, असे किशोर गजभिये यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT