Nana Patole - Narendra Modi  Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : '' भाजप आणि मोदींच्या राज्यात 'हा' एक; माणूस सुखी...'', काँग्रेसच्या पटोलेंनी डागली तोफ

Congress Jansanwad Yatra : '' आपलेच पैसे आपल्यालाच देऊन मोदी व भाजप, स्वत: ची पाठ थोपटून घेतंय...

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने जनतेची लूट चालवली आहे. शेतकरी,विद्यार्थी,गरीब,छोटे व्यापारी अशा सर्वांना लुटण्याचं त्यांचं काम सुरू आहे. मोदींच्या राज्यात गरीबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांनी नोटबंदी करुन आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि अदानींचा काळा पैसा पांढरा केला,असा हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी चढवला. मोदींच्या राज्यात अदानी हा एक माणूस सोडून बाकी कोणीही सुखी नाही, असा टोलाही त्यांनी लगावला

कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सध्या राज्यात सुरु असून सोमवारी (ता.११) तिचा नववा दिवस आहे. या यात्रेत कॉंग्रेसचे नेते भाजप आणि त्यांच्या केंद्र व राज्यातील सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) सडकून टीका करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वाखालील जनसंवाद यात्रा गोदिंया व भंडारा जिल्ह्यात पोहचली. यावेळी तिरोडा येथे झालेल्या सभेत त्यांनी मोदींवर तिखट शब्दांत टीका केली.

पटोले म्हणाले, पेट्रोल, डिझेलवर शेतकऱ्यांच्या नावाने चार रुपये कृषी कर घेतात. त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मोदी सरकार लुटते. वर्षभरात एका शेतकऱ्याकडून जवळपास एक लाख रुपये लुटतात. दुसरीकडे शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली फक्त सहा हजार रुपये देतात. अशा तऱ्हेने आवळा देऊन ते कोहळा काढतात.आपलेच पैसे आपल्यालाच देऊन मोदी व भाजप,मात्र स्वत: ची पाठ थोपटून घेतंय असाही घणाघात त्यांनी केला. तसेच मोदी व भाजप सरकारच्या काळात कोणी सुखी नसून फक्त एक व्यक्ती सुखी आहे अशी टीकाही नाना पटोले(Nana Patole) त्यांनी केली.

मोदी जे बोलतात नेमके त्याच्या उलटे करतात, शेतीचा खर्च कमी करून शेतमालाला दुप्पट भाव देतो असे ते म्हणाले होते. पण, प्रत्यक्षात शेतीचा खर्च प्रचंड वाढवला आणि शेतमालाचा भाव, मात्र कमी केला, असेही ते म्हणाले.

'मन की बात' का होते ?

लोकशाहीमध्ये लोकांचे ऐकायचे असते. पण, आता ‘मी’आहे. जेथे ‘मी’पणा येतो तेथे ‘आम्ही’पण संपते. म्हणूनच आता ‘मन की बात’होत आहे, असे पटोले म्हणाले.मोदी सरकार जनतेला विचारत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व लोकशाही संपवण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे, शेतकरी रोज मरतो आहे, तरुणांना रोजगार नाही, महागाईबद्दल सरकार बोलत नाही. निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत, ओबीसी व मागास समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. तलाठी भरतीतून तरुणांना कोट्यवधी रुपये सरकारने लुटले.

देशातील व राज्यातील भाजपचे सरकार जनतेच्या मुद्द्यावर लक्षच देत नाही. म्हणून जनतेच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. केंद्र व राज्यातील अन्यायी, अत्याचारी भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा आणि काँग्रेसला सत्तेत आणा, तुम्हाला न्याय देण्याचे काम करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT