Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar: चंद्रपूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट : वडेट्टीवार लोकसभा लढणार...

संदीप रायपूरे

Chandpur: लोकसभेची निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. आता चंद्रपूरच्या राजकारणातही नवा ट्विस्ट आला आहे. कालपर्यंत लोकसभा निवडणूक लढविण्यावर चुप्पी साधलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाने संधी दिल्यास आपली तयारी असल्याचे सांगत अनेकांना धक्का दिला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा कधीकाळी बालेकिल्ला होता, पण भाजपच्या हंसराज अहिर यांनी त्यांच्या या गडाला सुरुंग लावला. तब्बल चार वेळा या मतदारसंघातून ते निवडून आले, पण 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी त्यांच्यावर विजय मिळविला. हा पराभव अहिर यांच्यासह भाजप पक्षश्रेष्ठींच्या चांगलाच जिव्हारी लागला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर आता आगामी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे. दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे.

अशात आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीकरिता उभे राहणार असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. पक्षाने जर आपणास संधी दिली तर आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाची उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो आपणास मान्य असेल, असेही ते म्हणाले.

वडेट्टीवारांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत देत चंद्रपूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात काँग्रेसला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे बाळू धानोरकर यांच्या विजयात वडेट्टीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. हा मतदारसंघ त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित मानला जातो. त्यांची कन्या शिवानी या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. अलीकडे ब्रह्मपुरी मतदारसंघात त्या सातत्याने काम करताना दिसत आहेत.अशा वेळी शिवानी यांच्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवून विजय वडेट्टीवार हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीत चारशे जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. मागील निवडणुकीत चंद्रपूरची जागा हातून गेल्याने पक्षश्रेष्ठींनी हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. यासाठी एका नव्या ओबीसी चेहऱ्याची शोधाशोध त्यांनी सुरू केली आहे. अशात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून वडेट्टीवार यांची उमेदवारी भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहेत.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT