Nitin Gadkari, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Congress vs BJP Maharashtra politics : फडणवीसांशी मैत्री, गडकरींविरोधात लढले... भाजप प्रवेशाच्या चर्चांवर काँग्रेस आमदाराने ठासून सांगितले

Fadnavis Gadkari political fight : हल्लीच्या राजकारणात कोण केव्हा कुठल्या पक्षात दाखल होईल याचा भरवसा राहिला नाही. त्यामुळे ठाकरे हे आपल्या भीष्म प्रतिज्ञेवर किती दिवस कायम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घनिष्ट मैत्री आहे. दोन्ही नेत्यांनी या मैत्रीला कधी नकार दिला नाही. मात्र, या मैत्रीमुळे ठाकरे यांच्याकडे नेहमची शंकेने बघितले जाते. ते भाजपात जाणार अशा वावड्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीपूर्वी उठत असतात. ठाकरे यांनी आजवर यावर कधी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अशात नवरात्री उत्सवात ठाकरे यांच्या दुर्गादेवी मंडळाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावरून पुन्हा ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोरा आला.

यावर बोलताना ठाकरे म्हणाले, आमची मैत्री आहे. ती कायमच राहणार आहे. याचा अर्थ मी भाजपात जाणार असा होत नाही. मी काँग्रेसमध्ये वाढलो, काँग्रेसनेच मला घडवले त्यामुळे बापजन्मात भाजपात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हल्लीच्या राजकारणात कोण केव्हा कुठल्या पक्षात दाखल होईल याचा भरवसा राहिला नाही. त्यामुळे ठाकरे हे आपल्या भीष्म प्रतिज्ञेवर किती दिवस कायम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेची निवडणूक जिंकताच देवेंद्र फडणवीस नागपूर शहराचे महापौर झाले. त्यानंतर ते आमदार झाले. ठाकरे यांचीही राजकीय वाटचाल फडणवीस यांच्या प्रमाणाचे सुरू आहे. ते पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक जिंकले आणि महापौरपदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यानंतर त्यांना विधानसभेच्या तिकिटासाठी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. विशेष म्हणजे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. तेव्हा रणजित देशमुख यांच्यासारखा काँग्रेसचा तगडा उमेदवार त्यांच्या विरोधात उभा होता. त्यामुळे ठाकरे यांनी छुपी मदत फडणवीसांना केली असे चर्चा 20 वर्षांपासून शहरात आहे.

त्यानंतर नागपूरमध्ये एका विधानसभा मतदारसंघाची भर पडली. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे दोन तुकडे करून दक्षिण-पश्चिम हा नवा मतदारसंघ तयार झाला. फडणवीस यांनी नव्या मतदारसंघांची निवड केली. त्यांच्या जुन्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विकास ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. ऐनवेळी काँग्रेसने सूत्र फिरवली. ठाकरे यांच्या पश्चिमेमधून तत्कालीन मंत्री अनिस अहमद यांना उमेदवारी देण्यात आली.

तर काँग्रेसने ठाकरे यांना दक्षिण-पश्चिमधून फडणवीस यांच्याच विरोधात लढण्यास सांगितले. फडणवीस आणि ठाकरे यांच्यात कडवा मुकाबला झाला. यात फडणवीस निवडून आले. त्यानंतर ठाकरे यांनी पुन्हा आपला मोर्चा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाकडे वळवला. त्यांनी तिकट खेचून आणले. ते पुन्हा भाजपचे उमदेवार सुधाकर देशमुख यांच्याकडून पराभूत झाले.

ठाकरे यांनी हार मानली नाही. पुढच्या निवडणुकीत त्यांनी पराभवाचे उट्टे काढले. 2019 च्या निवडणुकीत देशमुख आमदार असतानाही शेवटपर्यंत त्यांना भाजपचे उमेदवारी जाहीर केली नव्हती. भाजपचे कार्यकर्ते सुद्धा त्यामुळे संभ्रमात पडले होते. मग काँग्रेसनेही उमेदवाराचे नाव गोपनीय ठेवले होते. काँग्रेसने ठाकरे यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करताच भाजपने देशमुख यांच्या नावाची शेवटच्या टप्प्यात घोषणा केली. देशमुख यांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची होती तर इतका विलंब का लावला याचे उत्तर भाजपच्या एकाही नेत्यांनी आजवर दिले नाही.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढले. त्यांचा जवळपास 1 लाख 37 हजार मतांनी पराभव झाला. पण विधानसभा निवडणुकीत ठाकरे पुन्हा निवडून आले आहेत. पक्षाच्या सर्वेत पश्चिम नागपूर भाजप जिंकणार असल्याचे दाखवत होते. भाजपचे नागपूर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक आणि रणनीकार कैलास विजयवर्गीय यांनीसुद्धा हाच दाव केला होता. ठाकरे अगदी थोडक्या मतांनी निवडून आले.

विशेष म्हणजे भाजपने याही निवडणुकीत उमेदवारीचा घोळा घालून ठेवला होता. दोन डझन उमेदवार येथून लढण्यास तयार होते. काहींनी 2 वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. शेवटच्या टप्प्यात दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पश्चिम नागपूरमध्ये ठाकरे यांच्या विरोधात लढण्यास पाठवले. या घोळ फडणवीस आणि ठाकरे यांच्या मैत्रीचाच भाग होता असे दावे केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT