Vidarbha News: महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, ही निवडणूक महायुतीसाठी सुरुवातीला आव्हानात्मक नव्हती. मात्र, निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असतानाच राजकीय घडामोडींनी ही निवडणूक महायुतीसाठी वाटती तितकीच सोपी नसणार असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीनंही पूर्ण आपली ती ताकद पणाला लावल्यामुळे महायुतीला पुरेसं संख्याबळ असतानाही घाम फुटल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होमग्राऊंड असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागपूर विधान परिषद निवडणुकीत सध्यातरी महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे. विजयासाठी आवश्यक मताधिक्यापेक्षा अधिक मतदार महायुती अर्थात भाजपकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं उमेदवार मैदानात उतरवला असला तरी पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.
महायुतीकडून नागपूर विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत पराभव जरी समोर दिसत असला तरी काँग्रेसकडून भाजपसमोर आव्हान उभं करतानाच विजयाचा दावा केला जात आहे.
काँग्रेसनं या नागपूर विधानपरिषद निवडणुकीला सामोरे जाताना नवा मु्द्दा प्रचारात मांडताना भाजपविरोधात रान पेटवण्यास सुरुवात केली आहे. जनगणनेत ओबीसींचा कॉलम वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच भाजप ओबीसींवर अन्याय करत असल्याचा हल्लाबोलही काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपमधील ओबीसी मतदारांनी लोंढेंना मतदान करावं असं आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी केलं आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे विधानपरिषदेच्या निवडणुकीत 'ओबीसी' कार्ड खेळताना दिसून येत आहे. या निवडणुकीत 836 मतदार असून एकट्या भाजप महायुतीकडेकडे 582 हून अधिक संख्याबळ आहे. त्यामुळे एकहाती विजय निश्चित असला तरी भाजपनं सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
काँग्रेस आणि महाविकास आघाडी आपल्या उमेदवाराच्या मतांसाठी फोडाफोडीचा डाव टाकण्याची शक्यता आहे. मतफुटीमुळे काही विपरित घडायला नको, या भीतीनं भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. यातूनच भाजपनं आपल्या नागपूर महापालिकेतील नगरसेवकांना थेट गोवा दौऱ्यावर पाठवले आहेत.
तर दुसरीकडे पराभव मान्य करत काँग्रेस 'सायलेंट झोन'मध्ये आहे. तसेच महाविकास आघाडीसह अपक्षांची मते फोडण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी बुटीबोरी नगर परिषदेतील काँग्रेसप्रणित परिवर्तन आघाडी भाजपच्या लागल्याचं गळाला पाहायला मिळाले.
नागपूर महापालिकेतील सुमारे शंभराहून अधिक नगरसेवकांना भाजपनं गोवा दौऱ्यावर पाठवले आहे. त्यानंतर त्यांना मुंबईत प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींमुळेच पक्षाच्या आत्मविश्वासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सत्ता, संघटनात्मक ताकद आणि जिंकण्यासाठी आवश्यक मतांची संख्या असतानाही नगरसेवकांना निवडणुकीपर्यंत एकत्र ठेवण्याचा आटापिटा भाजपला का करावा लागत आहे, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.