Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नागपूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काँग्रेसने ठरवले होते. त्यानुसार मंगळवारी नागपूरमध्ये पक्षाने निरीक्षक पाठवले होते. शहरातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, मुलाखतीला येण्याचे आवाहन केले असतानाही नागपूर ग्रामीणमधील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम ऐनवळी रद्द करण्यात आला. त्यामुळे मोठी नाराजी इच्छुकांनी व्यक्त केली.
काँग्रेसच्या (Congress) एका बड्या नेत्याने नागपूर ग्रामीणमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची गरज नाही असा फोन निरीक्षकाला केल्याने संपूर्ण मुलाखतींचा कार्यक्रमच रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याकरिता शुल्कही आकारण्यात आले होते. त्यानंतर प्रदेश काँग्रेस कमेटीच्यावतीने मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला.
जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली. नागपूर जिल्ह्यासाठी माजी मंत्री नसीम खान यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत मुलाखती घेऊन निरीक्षकांना अहवाल सादर करायचा होता. मात्र, सणवारामुळे मुलाखतींना उशिर झाला असल्याचा खुलासा नसिम खान यांनी केला.
सोमवारी नागपूर जिल्ह्यातील मुलाखतींचा कार्यक्रम काँग्रेस कमेटीच्यावतीने जाहीर करण्यात आला. नागपूर (Nagpur) शहर व ग्रामीण अशा १२ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
त्यानुसार शहर आणि ग्रामीणमधील इच्छुकांनी रविभवन येथे एकच गर्दी केली होती. शहरातील इच्छुकांच्या मुलाखतींचे सोपस्कार काँग्रेसने पार पाडले. मात्र ग्रामीणच्या इच्छुकांना परत पाठवण्यात आले
ग्रामीणच्या मुलाखतींचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. अनेकांनी निरीक्षक नसिम खान यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनाही समाधानकारक उत्तर देता आले नाही.
इच्छुकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आणि त्यांच्या कार्यालयात फोन करून याची विचारणा केली. त्यांना नागपूर ग्रामीणमधील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम ठरलाच नव्हता असे सांगण्यात आले.
काही पदाधिकाऱ्यांनी मुलाखती घेण्यात आहे याची माहितीच नसल्याचे इच्छुकांना सांगितले. जेव्हा पक्षातर्फे सूचना येतील तेव्हा मुलाखतींना बोलवू असे सांगून त्यांची बोळवण केली. नागपूर ग्रामीणमध्ये वर्चस्व असलेल्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून मुलाखतींचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.