Mallikarjun Kharge at Nagpur Maharally. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress Rally : चिठ्ठीत लिहून आले.. अन् खर्गे मराठीत बोलायला लागले

अभिजीत घोरमारे

Bharad Jodo Ground : देशासाठी काम करीत असल्याचा आव आणणारे नरेंद्र मोदी हे खोटारडे आहेत. खोटं बोला पण रेटून बोला ही त्यांची वृत्ती आहे. देशाचे तुकडे होऊ द्यायचे नसतील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा स्वत:वर हावी होऊ द्यायचा नसेल, तर जनतेने आताच सतर्क होणे गरजेचे आहे. मोदी-शाह आणि संघाच्या अजेंड्याला थांबविण्याची हिंमत केवळ काँग्रेस पक्षात आहे, असे ठाम प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी केले.

काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथील दिघोरी परिसरात आयोजित महारॅलीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार राहुल गांधी यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, काँग्रेसशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार, आमदार उपस्थित होते. भाषणाला सुरुवात केल्यानंतर खरगे पहिल्यांदा हिंदीतून बोलत होते. मात्र त्यांना मान्यवरांमधून मराठी बोलावे, असे लिहिलेली चिठ्ठी प्राप्त झाली. ही चिठ्ठीही त्यांनी जाहीर वाचून दाखविली. त्यानंतर त्यांनी मराठीतून भाषण केले.

आपल्या प्रदीर्घ संबोधनात खर्गे यांनी नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच घणाघात केला. खर्गे यांना बहुतांश काळ दक्षिण भारतात गेला आहे. त्यामुळे त्यांच्या भाषेचा लहेजा जरा वेगळाच होता. त्यामुळे ते मोदींबद्दल एकेरी भाषेत बोलत असल्याचा आभास होत होता. परंतु ‘दिसते तसेच नसते’ हे त्यांनी आपल्या मर्यादेच्या कक्षेत राहून बोलताना दाखवून दिले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातून आरक्षण, दलित, ओबीसी हद्दपार करायचे आहेत. त्यांचे तसे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ द्यायचे नसतील तर आगामी निवडणुकीत राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीच्या पाठिशी उभे राहा, असे आवाहनही त्यांनी केले.

सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी अनेक वचने दिली होती. परंतु त्यातील एकही वचन त्यांनी पाळलेले नाही. हा जनतेचा विश्वासघात आहे. एखाद्या व्यक्तीने किती खोटे बोलावे, यालाही मर्यादा असतात. मोदींनी या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्यांची उलटगिनती सुरू झाली आहे. लवकरच भाजपचे पतन होईल, असा इशाराही खर्गे यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरातील दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायींसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. याची साक्ष येथील दीक्षाभूमी आजही देते. बाबासाहेबांच्या कर्मभूमित आल्याचे भान ठेवत काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणादरम्यान आवर्जुन ‘जयभीम’चा नारा बुलंद केला. खरगे म्हणाले की देशातील संसदेत आता घुसखोरी होण्यापर्यंतची वेळ आली आहे. आम्ही सरकारला यावर प्रश्न विचारला. परंतु त्यांना उत्तर द्यायचे नाही. ते केवळ खासदारांना निलंबित करण्यात धन्यता मानत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेवर टिकून राहण्यासाठी नरेंद्र मोदी वेगवेगळ्या युक्त्या करीत आहेत.

आता मोदींच्या सर्व युक्त्या जवळपास संपल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचा काळ जवळ येताच त्यांनी आता धर्माचे कार्ड पुन्हा वर काढले आहे. धर्माच्या नावाखाली सुरू असलेला प्रचार म्हणजे मोठी भुलभुलय्या आहे. ते मोठे चक्रव्यूह आहे. या चक्रव्युहात अडकाल तर कायमचे भरकटाल, असा इशाराही द्यायला खर्गे विसरले नाहीत.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT