Bharat Jodho Ground : भाजपचा कारभार हुकुमशाही पद्धतीचा आहे. भाजपमधील नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. त्याचे जीवंत उदाहरण काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आहेत. शेतकऱ्यांना जीएसटीच्या मुद्द्यावर पटोले यांनी प्रश्न विचाल्याने मोदी नाराज झालेत. त्यामुळे त्यांना डिवचण्यात आल्याचा घणाघात खासदार राहुल गांधी यांनी केला. अशीच परिस्थिती देशात असल्याचे अनेक भाजप खासदार आपल्याला सांगतात असा दावाही राहुल यांनी केला.
काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूर येथील दिघोरी परिसरातील मैदानावर आयोजित महारॅलीत ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेसमधील वरिष्ठ नेते, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमित काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा होत असल्याचा आनंद आहे. डॉ. आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. परंतु हे संविधान काही मंडळी मानत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ब्रिटिशांची जुलुमी राजवट होती. सुमारे पाचशे राजांची सत्ता होती. सामान्य जनतेला मात्र कोणतेही अधिकार नव्हते. काँग्रेसने हे अधिकार सामान्यांना मिळवून दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील अनेक विद्यापीठांमध्ये असे कुलगुरू नेमण्यात आले आहेत ज्यांना काहीच येत नाही. केवळ एका विचारधारेशी संबंधित असल्याने त्यांना नेमणूक देण्यात येत आहे. अग्निवीर योजनेमुळे सैन्यदलात निवड झालेल्या दीड लाख लोकांना नोकरी नाकारण्यात आला. यातील अनेक युवक आपल्याला भेटले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार कथन केला, असा दावाही राहुल यांनी केला. ओबीसी समाजाच्या समस्यांवर बोलताना राहुल यांनी जातीय जनगणनेची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला ओबीसी म्हणवून घेतात. मात्र प्रश्न विचारला की ते देशात केवळ एकच जात असल्याचे सांगतात. ही जात गरीब असल्याचे मोदींचे म्हणणे आहे. मोदी असे म्हणत असतील तर ओबीसींचे प्रश्न कुठे गेले, असा सवालही त्यांनी केला.
देशात दोन हिंदुस्थान आहेत. एक अरबपतींचा आहे, दुसरा सामान्यांचा आहे. श्रीमंतांना अधिक श्रीमंत बनविले जात आहे. तरुणाईला मोबाईल आणि सोशल मीडियात गुंतवून ठेवले जात आहे. तरुणाईला रोजगार देण्याचे काम मोदी सरकार करू शकत नाही. हे काम केवळ ‘इंडिया’ अघाडीच करू शकते, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली, त्यावेळी आपल्याला महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आपण नागपुरात आल्याचे ते म्हणाले. देशात परिवर्तन घडणार आहे. काँग्रेसची सत्ता देशात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी तयार राहावे, असा विश्वासही त्यांनी उपस्थिताना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.