Congress leaders Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar  Sarkarnama
विदर्भ

Congress News : खासदार धानोरकरांना मिळालेल्या 15 सह्यांनी वाढवलं वडेट्टीवारांचं टेन्शन : गटनेत्याची उचलबांगडी कन्फर्म

चंद्रपूर काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील गटबाजी पुन्हा समोर आली आहे.

प्रमोद काकडे : सरकारनामा ब्युरो

Congress : चंद्रपूर काँग्रेसमधील खासदार प्रतिभा धानोरकर विरुद्ध आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. वडेट्टीवार समर्थक आणि महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक १५ नगरसेवकांनी स्वाक्षरी केलेल्या नोटीसद्वारे विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.

सध्या हे नगरसेवक अज्ञातस्थळी ‘पर्यटनासाठी’ गेले आहेत. विशेष म्हणजे, या १५ नगरसेवकांमध्ये आमदार विजय वडेट्टीवार समर्थक पाच नगरसेवकांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे सावध झालेल्या वडेट्टीवार समर्थक उर्वरित ११ नगरसेवकांनीही तातडीने एकत्र येत ‘देवदर्शन’ दौऱ्याचा मार्ग धरल्याची चर्चा आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक आहेत. मनपा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार यांच्यात नगरसेवकांच्या पळवापळवीचे राजकारण रंगले होते. हे प्रकरण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर महापौरपद धानोरकर गटाला आणि गटनेतेपद वडेट्टीवार गटाला असा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती.

मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली. त्यानंतर काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी एकमताने राजेश अडूर यांची गटनेते म्हणून निवड केली होती. मात्र, स्थायी समितीवरील नियुक्त्यांमध्ये खासदार धानोरकर समर्थक नगरसेवकांना स्थान न दिल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याची दखल घेतल्याची चर्चा होती. सभागृहनेतेपदही अडूर यांनी स्वतःकडेच ठेवल्याने वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर १० जून रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये गटनेते अडूर यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

अडूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला महापौरपद मिळविण्यात अपयश आल्याचा, स्थायी समिती व इतर समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्याचा तसेच सत्ताधारी पक्षाविरोधात प्रभावी भूमिका घेण्यात अपयश आल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

१५ जून रोजी सकाळी ११ वाजता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात होणाऱ्या बैठकीत अडूर यांना गटनेतेपदावरून हटविणे, नवीन गटनेत्याची निवड करणे, तसेच काँग्रेस महापालिका गटाच्या रचना, पदाधिकारी व कार्यपद्धतीत आवश्यक बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत.

या नोटीसवर अजय बळकी, संगीता भोयर, सईदाबी शेख, रामनरेश यादव, सुनंदा धोबे, सुरेंद्र अडवोले, वैशाली महाडोळे, राहुल घोटेकर, राहुल चौधरी, करुणा चालखुरे, संगीता अमृतकर, सुनील खंडेलवाल, आकाश मानकर, महानंदा वाकोडे आणि शिला सिडाम या १५ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

साधे बहुमत हवे :

महानगरपालिकेत गटनेता बदलण्यासाठी साधे बहुमत आवश्यक असते. म्हणजेच, एकूण सदस्यांच्या किमान ५० टक्के सदस्यांचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक आहेत. गटनेता बदलविण्यासाठी किमान १४ नगरसेवकांची स्वाक्षरी गरजेची आहे. अशावेळी १५ स्वाक्षऱ्यांसह जारी झालेली नोटीस अडूर यांच्या अडचणी वाढविणारी मानली जात आहे.

गटनेतेपदावरून हटविण्याचा डाव यशस्वी होणार नाही – राजेश अडूर

काल रात्रीपासून काही काँग्रेस नगरसेवकांचे मोबाईल फोन नॉट रिचेबल असल्याचे दिसून येत असून, काही नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मी दलित समाजाचा असल्यामुळेच मला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे बहुसंख्य नगरसेवक आपल्या संपर्कात असून विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचा दावा करत, गटनेतेपदावरून हटविण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होणार नसल्याचा विश्वास अडूर यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT