

Congress News : चंद्रपूर महानगरपालिकेतील खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक तब्बल १५ नगरसेवक पर्यटनासाठी अज्ञात स्थळी गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या १५ नगरसेवकांमध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांच्या समर्थक पाच नगरसेवकांचाही समावेश आहे. या घडामोडींमुळे सावध झालेल्या वडेट्टीवार समर्थकांच्या उर्वरित ११ नगरसेवकांनीही तातडीने एकत्र येत 'देवदर्शनाचा' मार्ग धरला आहे. महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यासाठीच हा 'मान्सूनपूर्व पर्यटनाचा' बेत आखण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक आहेत. मनपा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या पहिल्याच दिवसापासून खासदार धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात नगरसेवकांच्या पळवापळवीचा खेळ सुरू झाला होता. हे प्रकरण थेट दिल्ली हायकमांडपर्यंत पोहोचले होते. दरम्यानच्या काळात खासदार धानोरकर समर्थक नगरसेवकांनी १४ जणांचा स्वतंत्र गट स्थापन केला होता, मात्र त्यात वडेट्टीवार समर्थक सामील झाले नव्हते. दिल्लीतील नेत्यांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला. महापौरपद खासदार धानोरकर गटाला आणि गटनेतेपद आमदार वडेट्टीवार गटाला, असा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता.
मात्र, ऐनवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेस सत्तेपासून वंचित राहिली. तत्पूर्वी काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी एकत्र येत राजेश अडूर यांची गटनेते म्हणून निवड केली होती. मात्र, स्थायी समितीवर नावे पाठवताना अडूर यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशांना केराची टोपली दाखवली. त्यांनी स्थायी समितीत खासदार धानोरकर समर्थक एकाही नगरसेवकाला स्थान दिले नाही. याची गंभीर दखल सपकाळ यांनीही घेतली होती. दिल्लीतूनही अडूर यांना पदावरून हटविण्याचे निर्देश आल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी खासदार धानोरकर यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नव्हते.
सभागृहनेतेपदही अडूर यांनी स्वतःकडेच ठेवल्याने वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांमध्ये त्यांच्याविषयी असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषाचा फायदा घेत खासदार धानोरकर यांनी थेट वडेट्टीवार समर्थक ५ नगरसेवकांना आपल्या गोटात ओढले. सध्या हे १५ नगरसेवक 2 दिवसांपूर्वीच अज्ञातस्थळी पर्यटनासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे आता आमदार वडेट्टीवार यांच्याकडे केवळ १२ नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. त्यातील एका नगरसेवकाची प्रकृती ठीक नसल्याने शेजारच्या राज्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, देवदर्शनासाठी गेलेल्या वडेट्टीवार समर्थक ११ पैकी आणखी ३ नगरसेवक खासदार धानोरकर यांच्या गटात जाण्यास उत्सुक असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या संपूर्ण 'टूर'चा मुख्य हेतू गटनेतेपदावरून राजेश अडूर यांना हटवणे हाच असल्याचे समजते. या विषयावर सध्या दोन्ही बाजूंचे कोणतेही नेते अधिकृतपणे बोलण्यास तयार नसले, तरी येत्या दोन दिवसांत चंद्रपूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.
साधे बहुमत हवे :
महानगरपालिकेत गटनेता बदलण्यासाठी संबंधित पक्षाच्या किंवा आघाडीच्या एकूण नगरसेवकांपैकी साधे बहुमत आवश्यक असते. म्हणजेच, एकूण सदस्यांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक सदस्यांचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक आहेत. गटनेता बदलविण्यासाठी किमान १४ नगरसेवकांची संमती आणि स्वाक्षरी आवश्यक ठरते. गटनेत्याच्या निवडीचा किंवा बदलाचा अंतिम अधिकार पक्ष नेतृत्वाकडे असतो. नवीन गटनेत्याची निवड झाल्यानंतर बहुसंख्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांसह आणि पक्षाच्या अधिकृत पत्रासह प्रस्ताव विभागीय आयुक्त किंवा महापालिका आयुक्तांकडे सादर करावा लागतो. केवळ गटनेता बदलण्यासाठी साधे बहुमत पुरेसे असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.