Congress Supporters Clash Over Jichkar’s Re-entry : नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्याशी दोन हात करणारे आणि विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे बडतर्फ नेते नरेंद्र जिचकार यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. सपकाळ यांनी परिस्थिती आणि कार्यकर्त्यांचा विरोध बघून माघार घेतल्याने जिचकारांचा पक्ष प्रवेशाचा मार्ग तात्पुरता बंद झाला असल्याचे दिसून येते.
सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार यांचा समावेश आहे. मात्र नरेंद्र जिचकार हे अद्यापही वेटिंगवरच आहेत. त्यांचे समर्थक सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र ठाकरे यांच्या आक्रमकपणामुळे कोणाचाही उघडपणे त्यांना विरोध करण्याची हिंमत नाही.
दीक्षाभूमी ते सेवाग्राम या दरम्यान संविधान सत्याग्रह यात्रा काढण्यात आली होता. याकरिता सपकाळ नागपूरमध्ये मुक्कामी होते. जिचकार कुटुंबीयांशी त्यांचा घरोबासुद्धा आहे. या दरम्यान नरेंद्र जिचकार यांनी त्यांची भेट घेतली. हे वृत्त समजताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच घेराव घातला. काँग्रेसने जिचकार यांना बडतर्फ केले आहे. त्यांची भेट घेण्याचे कारण काय अशी थेट विचारणा केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना सारवासारव करावी लागली.
ठाकरे आणि जिचकार यांचे जुने राजकीय वैर आहे. त्यात ठाकरे बारा वर्षांपासून नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. सहा वर्षांपासून आमदार आहेत. राहुल गांधी यांनी एक व्यक्ती एक पद असा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात केला होता. या ठरावाची अंमलबजावणी का केली जात नाही, अशी विचारणा नरेंद्र जिचकार वारंवार करायचे.
तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिथे भेटतील, तिथे त्यांचा हाच प्रश्न असायचा. ता. 12 ऑक्टोबर 2023 ला काँग्रेसची नागपूर विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीला पटोले यांच्यासह विदर्भातील सर्वच नेते उपस्थित होते. नेत्यांचे भाषणे सुरू असताना जिचकार मंचावर आले. त्यांना पुन्हा तोच प्रश्न उपस्थित करताच ठाकरे यांच्या समर्थकांनी त्यांना धक्काबुक्की सुरू केली.
बैठकीत असलेल्या जिचकार समर्थकाही त्यानंतर धावून घेतले. त्यावरून तुफान राडा झाला होता. हे प्रकरण शिस्तभंग समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले होते. जिचकार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर जिचकारांनी विधानसभेच्या निवडणुकीत विकास ठाकरे यांना पराभूत करण्याचा संकल्प केला होता.
पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून बंडाचे निशाण फडकावले होते. मात्र त्यात ते अपयशी ठरले. सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या आशा उंचावल्या होत्या. संपकाळांच्या कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणात जिचकार समर्थकांचा भरणा आहे. मात्र नागपूर शहर काँग्रेसवर ठाकरे यांची पकड आहे. त्यांना दुखावणे सपकाळ यांनाही अवघड आहे. हे बघता जिचकारांचा काँग्रेस पक्ष प्रवेशही सध्या शक्य नसल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.