Agriculture Exhibition File Photo
विदर्भ

Yavatmal : कृषी महोत्सवाला शेतीविषयक दर्दी नव्हे खवय्यांचीच झाली गर्दी; राजकीय अनास्थाही!

सतीश हरिश्चंद्र येटरे

Lack of Political Interest : कृषी उत्पादन वाढविण्यासाठी शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर कृषी महोत्सवांचे आयोजन केले जाते. त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही खर्चही केला जातो. यंदाही यवतमाळच्या समता मैदानात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र राजकीय अनास्थेने कृषी महोत्सव खाद्य महोत्सव ठरत आहे.

कृषी महोत्सवातील एकाही सत्रात शेतकऱ्यांची भरगच्च उपस्थिती नव्हती. त्यामुळे या महोत्सवांची फलश्रुती काय? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. यंदा अस्मानी, सुल्तानी संकटांनी जिल्ह्यातील शेती उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

शेतकरी आणि विविध संघटनांनी मदतीसाठी मोठाले मोर्चे काढले. पिकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना अनेक ठिकाणी मारहाण झाली. त्यानंतर ताळ्यावर आलेल्या सरकारने अनेक घोषणा केल्या. असे असले तरी केवळ घोषणांचा पाऊसच पाडल्या गेला. शेतकरी सन्मान निधीची रक्कम, खरडीची मदत, शेती पिकांचे नुकसान यापैकी बहुतांश मदत हजारो शेतकऱ्यांपर्यंत आजतागायत पोहोचलेली नाहीत.

शेतकरी उपाशी असताना त्यांना शेतीक्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होऊन उत्पादनात वाढ व्हावी, या नावाखाली यवतमाळच्या समता मैदानात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शेती अवजारे, हरीतगृह, बायटेक्नॉलॉजी, फलोत्पादन, रेशीम उद्योग या सर्वांची माहिती एकाच छताखाली मिळावी, हा हेतू या आयोजनामागे होता. मात्र महसुलात भर पडावी, यासाठी कृषी विभागाने तेथे खाद्य पदार्थांच्या स्टॉलला परवानगी दिली. परिणामी, या महोत्सवात शेतकऱ्यांऐवजी खवय्यांचीच गर्दी पहायला मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कृषी महोत्सवात प्रगतीशिल शेतकरी आणि तज्ञांकडून अनेक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बळीराजाने या सत्रांकडे पाठ फिरविली. परिणामी, तेथील खुर्च्या रिकाम्या राहिल्या. एवढेच नव्हेतर लाखो रुपये खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या या कृषी महोत्सवाची नेमकी फलश्रुती काय, असा प्रश्‍नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

शेतकऱ्यांचे कैवारी तोंडघशी

यवतमाळ जिल्हा हा मातब्बर राजकारण्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने दोन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला दिले आहेत. अनेकांनी मंत्री म्हणूनही मोठा काळ गाजविला आहे. शेतकरी अडचणीत असला की, त्याच्या बांधावर जाऊन सांत्वन करायचे. त्यानंतर मदतीची घोषणा झाली की, त्याचे श्रेय लाटायचे. प्रसंगी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आव आणायचा, असा कित्ता जिल्ह्यातील राजकारणी आणि लोकप्रतिनिधींकडून गिरविला जातो.

कृषी महोत्सवातही ही बाब पाहायला मिळाली. शेतकऱ्यांनी प्रगतीशिल शेतकरी आणि तज्ज्ञांकडून शेती उत्पादन वाढीसाठी ज्ञान घेतले पाहिजे, यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने अथवा राजकीय नेत्याने कुठलाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळेच हा कृषी महोत्सव ‘फेल’ गेल्याचे चित्र आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आव आणणारे नेते आणि राजकारणी आता तोंडघशी पडल्याची चर्चा आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT