Datta Meghe sarkarnama
विदर्भ

Datta Meghe - दत्ता मेघेंचा विदर्भाला मोठा धक्का; सावंगीच्या हॉस्पिटलसह सगळं साम्राज्य अदानींच्या हाती!

Datta Meghe Institute of Medical Sciences and University of Abhimat - दत्ता भाऊंच्या शैक्षणिक संस्था राजकीय कार्यकर्तेच नव्हे सामाजिक चळवळीतील अनेकांसाठी हक्काचा आधार होता.

Rajesh Charpe

Datta Megh and Adani Foundation - भाजप उद्योगपती अदानी यांच्या हाती महाराष्ट्र सोपवत असल्याचा आरोप काँग्रेस महाविकास आघाडीमार्फत सातत्याने केला जात आहे. मुंबईतील कोट्यवधींची जागा मोफत दिल्याचाही दावा केला जात आहे. हे सर्व आरोप उद्योग आणि कंत्राटाबाबत असताना विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी अशी ओळख असलेल्या दत्ता मेघे यांनी आपले सावंगी येथील हॉस्पिटलसह, सर्व मेडिकल कॉलेज आणि विविध शिक्षण संस्था अदानी फाऊंडेशनला सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेघे आणि अदानी फाऊंडेशन या दोन्ही संस्थांमध्ये तसा करारसुद्धा झाला आहे. आजवर राजकीय धक्के देणाऱ्या दत्ताभाऊंच्या या निर्णयामुळे संपूर्ण विदर्भाला मोठा धक्का बसला आहे. दत्ताभाऊंच्या हे हॉस्पिटल आणि शिक्षण संस्था वर्धा जिल्हा आणि आजूबाजच्या जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी हक्काचा आधार होता. आजवर लाखो लोकांनी त्यांच्या हॉस्पिटलमधून मोफत उपचार घेतले आहेत. अनेकांना त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेतून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

दत्ता मेघे हे ऐकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. ते मंत्री होते, खासदार होते. आज माझ्याकडे जे काही आहे ते सर्व पवार साहेबांमुळे असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी मेघे यांनी शरद पवार यांची साथ सोडली होती. मात्र पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणातून सेवानिवृत्ती स्वीकारली. मेघे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सागर मेघे यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले होते. वडील राष्ट्रवादी आणि मुलगा भाजपात यावरून त्यावेळी मेघे यांच्यावर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सातत्याने टीका करीत होते. हे बघून सागर मेघे यांनी कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

नंतर त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेत लक्ष घालणे सुरू केले होते. 2014 मध्ये काँग्रेसने सागर मेघे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपने मेघे यांचेच एकेकाळचे समर्थक रामदास तडस यांना उमेदवारी दिली होती. तडस हे डमी उमेदवार आहेत असेही त्यावेळी बोलले जात होते. मात्र निकाल एकदम उलट लागला. मेघे यांच्याऐवजी तडस निवडून आले होते. या दरम्यान भाजपने त्यांचे धाकटे चिरंजीव समीर मेघे यांना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. ते दोन वेळा निवडून आले असून भाजपात चांगलेच रुळले आहेत.

दत्ताभाऊ मेघे यांचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मध्यंतरी त्यांनी आपली संपत्तीच्या वाटणीचे पत्र गडकरी यांच्याकडे ठेवले असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था व अभिमत विद्यापीठाच्या अखत्यारित वैद्यकीय, आयुर्वेद, दंतसह इतरही बरेच वैद्यकीय महाविद्यालय आहे. 6 मे 2025 रोजी वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे असलेल्या विद्यापीठाच्या रुग्णालयाला प्रीती गौतम अदानी यांनी भेट दिली होती. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालादेखील अदानी फाऊंडेशनचे अध्यक्ष व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हापासूनच अदानी समूहाचा इंटरेस्ट वाढत असल्याचे बोलले जात होते. दोन्ही संस्थांमध्ये समझोता झाल्यानंतर अदानी फाऊंडेशनच्यावतीने हा व्यावसायिक करार नसून सेवा आणि करुणेचे साधन असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT