Nagpur News : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानग्रस्त भागात तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ही माहिती दिली.
सोमवारी (ता. 27) नागपुरात आगमन झाल्यानंतर फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील विविध भागांना रविवारी (ता. 26) अवकाळी पाऊस व गारपिटीनं तडाखा दिला. त्यावर त्यांनी भाष्य केलं. (DCM Devendra Fadnavis Says Government Has Given Instructions To Collector For Survey Unseasonal Rain & Hail In Maharashtra)
रविवारी रात्री पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी पाऊस व गारपिटीनं तडाखा दिला. मुसळधार पावसामुळं अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. युद्धपातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम सध्या महावितरणकडून (MSEDCL) करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना शासनस्तरावरून सूचना दिलेल्या आहेत. कुठे किती नुकसान झालंय याचा प्राथमिक अहवाल घेण्यात येत आहे. तातडीनं हा अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची मदत करण्याची असेल. सध्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं नेमके किती नुकसान झालं आहे, असे सांगणं अवघड आहे. यासंदर्भातील अहवाल प्राप्त होताच सरकार मदतीची घोषणा निश्चितपणे करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणची पीक परिस्थिती वेगवेगळी आहे. जिथे नुकसान होईल, त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करेल असं ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही भाष्य करणं टाळलं. सुनावणी जेथे सुरू आहे. त्या प्राधिकरणाला ‘ज्युडिशियल आणि ट्रिब्युनल’चा दर्जा आहे. त्यामुळे सुनावणीवर कोणतंही भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट करीत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
निवडणुकीच्या जागावाटपांबाबत ते म्हणाले की, आपण यापूर्वी यासंदर्भात भूमिका जाहीर केली आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो की, यासंदर्भात अद्याप आमची चर्चा व्हायची आहे. चर्चेनंतरच जागावाटपाबाबत अंतिम सूत्र ठरेल. त्याचा आधार काय असेल, तर जो ज्या जागांवर लढला आहे, तो साधारणपणे त्या जागा लढवणार. असं असलं तरी तो सध्या अंतिम निर्णय नाही. त्यात बदल शक्य आहेत, असं फडणवीस यांनी नमूद केलं.
Edited by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.