Yavatmal NCP
Yavatmal NCP Sarkarnama
विदर्भ

राष्ट्रवादीमधील वाद उफाळला; घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खोडकेंनी सुनावले

सरकारनामा ब्यूरो

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) अंतर्गत खदखद आज (ता. ३ एप्रिल) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. पक्षाच्या आढावा बैठकीत पक्ष निरीक्षक आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके (Sanjay Khodke) यांच्या उपस्थितीतच माजी आमदार संदीप बाजोरिया (Sandeep Bajoria) हे येऊन कार्यकर्त्यांमध्ये बसले. जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर यांनी विनवणी केल्यानंतर ते स्टेजवर गेले. त्यावरून खोडके यांनी नाराज व्यक्त करत यापुढे असे चालणार नाही, असा सज्जड दम भरला. (Dispute in Yavatmal NCP came to the fore)

दरम्यान, या आढावा बैठकीच्या अगोदर सकाळी यवतमाळ शहरात जिल्हा क्रांती कामारकर यांना पदावरून हटवा अणि राष्ट्रवादी वाचवा असे फ्लेक्स लागले होते. त्यामुळे हे फ्लेक्स कुणी लावले आणि जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर कुणाला नको आहेत, याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या दहा एप्रिल रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीसाठी पक्ष निरीक्षक आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके उपस्थित होते. त्यांच्या समोरच गटबाजीचे प्रदर्शन झाले. जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर यांना पदावरून हटवा असे पोस्टर शहरात लागल्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आढावा बैठकीस सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार संदीप बाजोरिया बैठकीत आले. ते थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसले. तेव्हा जिल्हाध्यक्ष कामारकर त्यांच्या जवळ गेले आणि व्यासपीठावर चला म्हणून त्यांना विनंती करू लागले. काही वेळानंतर माजी आमदार संदीप बाजोरीया व्यासपीठावर गेले. त्यानंतर कार्यक्रमात घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर त्यावर हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी खोडके यांनी कार्यकर्त्यांना दिली. एकंदरीत राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत दोन गटातील खदखद चव्हाट्यावर आल्याने खोडके यांनी नाराजी व्यक्त केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अमरावतीत दहा एप्रिल रोजी राष्ट्रवादीचा मेळावा आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी यवतमाळमध्ये आज (ता. ३ एप्रिल) पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीपूर्वीच शहरभर जिल्हाध्यक्ष हटाव आणि राष्ट्रवादी बचाव, असे फ्लेक्स लागले होते. त्याचे पडसाद या बैठकीवर होते. पण हे फ्लेक्स कोणी लावले, याचा शोध लागू शकला नाही. जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर यांना हटविण्यात यावे, असे फ्लेक्स शहरात ठिकठिकाणी लावण्यात आल्याने पक्षातील खदखद पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. त्यातच बाजोरिया कार्यकर्त्यांमध्ये बसल्यानेही खोडके यांनी नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT