इंदापूर : इंदापूर (Indapur) तालुक्यातील आठ हजार शेतकऱ्यांनी सोसाट्यांमधून कर्ज काढून नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स घेतले आहेत. मात्र, त्यांना अजूनही कारखान्याने सभासद करून घेतले नाही. खुद्द जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनासुद्धा अजून सभासद केलेले नाही. ...का भीती वाटते का?...काय होतंय काय...? सहकार हा सर्वांचा आहे. मी यासंदर्भात आता सहकारी मंत्री बाळसाहेब पाटील आणि सहकार आयुक्त यांच्याशी बोलणार आहे. आम्हाला कोणाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. पण, जे स्वतःच्या हातात असणाऱ्या संस्थांपासून शेतकऱ्यांना दूर ठेवणार असतील तर तेही आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कारखान्याच्या चौकशीचे अप्रत्यक्ष संकेत दिले. (Ajit Pawar hints at Harshvardhan Patil's Sugar factory's inquiry)
हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, भिगवण गटाच्या माजी जिल्हा परिषद राणी आढाव, युवक नेते दीपक जाधव, माजी सभापती स्वाती शेंडे, बापूराव शेंडे व त्यांच्या समर्थकांनी आज (ता. ३ एप्रिल) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे तीन हजार सभासद आहेत. त्यात बाहेरचे सभासद हजार ते बाराशे आहेत. बावडा परिसरातील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी नीरा भीमा सहकारी साखर कारखाना उभारणीवेळी सोसायटीतून कर्ज काढून शेअर्स खरेदी केले आहेत. त्यांना अजूनही सभासद केलेले नाही. खुद्द श्रीमंत ढोले यांनाही अजून सभासद केलेले नाही. का कुठं दुखतंय का....का भीती वाटते...काय होतंय काय...? छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर कारखान्याच्या परिसरातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांनी शेअर्सची रक्कम भरली आहे, त्यांना लगेच सभासद करून घेतले जाते. खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम आम्ही त्या ठिकाणी करत आहेत. अशा पद्धतीने मोजकीच माणसं जी ऊठ म्हटलं की उठणारी आणि बसं म्हटलं की बसणारी, अशा पद्धतीचे राजकारण आम्ही करत नाही.
श्रीमंत ढोले आणि त्यांचे सहकारी मला सांगत होते, दादा आम्ही शेअर्सची रक्कम भरली आहे. काहींनी सोसायटीतून कर्ज काढून भरले आहेत, तरीही आम्हाला सभासद केले जात नाही. हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल करून अजित पवार म्हणाले की, आज येथील शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्यात गाळपाला जाईल का नाही, याची काळजी आहे. पण, त्याबाबत तुम्ही घाबरू नका. कारण, येथे वीरधवल जगदाळे बसले आहेत, त्यांना याबाबत मी विचारत होतो, त्यावेळी त्यांनी सांगितले की, या परिसरातील साडेतीन लाख टन ऊस आपण गाळपाला नेला आहे. अजूनही नेला जात आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही.
पालकमंत्री पवार म्हणाले की, बारामती ॲग्रो कारखान्याची गाळप क्षमताही साडेनऊ हजार टनांची झाली आहे. छत्रपती कारखान्याची गाळपक्षमता साडेसात ते आठ हजार, माळेगावची नऊ हजार, सोमेश्वरचे आज दुसरे युनीट सुरू केले आहे, त्यामुळे तोही साडेआठ हजार टनांवर गेला आहे. बबनदादा शिंदे यांच्या कारखान्याची साडेबारा हजार टनांची गाळप क्षमता आहे, त्यामुळे उस गाळपाची चिंता करू नये.
नीरा भीमा कारखान्याने उसाला प्रतिटन २३८० रुपये, तर दौंड शुगरने २८७५ रुपये भाव दिला आहे. या दोन्ही कारखान्यांच्या ऊसाच्या भावात सुमारे ५०० रुपयांचा फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांनी ५०० रुपये कमी का घ्यायचे, कशासाठी घ्यायचे. का तर तुमच्या नाकर्तेपणामुळे घ्यायचे. तुम्ही कारखाना नीट चालवू शकत नाही; म्हणून घ्यायचे, तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून घ्यायचे, याचीही विचार शेतकऱ्यांनी करावा. अशा पद्धतीने फसवेगिरीचे राजकारण करणाऱ्यांना थारा देऊ नका. आम्हीही चुकीचं सांगितलं, तर आमच्याही पाठीशी तुम्ही यायचं काम नाही, अशा शब्दांत हर्षवर्धन पाटील यांच्या कारभावर अजित पवारांनी बोट ठेवले.
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्व पणाला लावू
इंदापूर तालुक्यातील बावीस गावांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला. त्यातून गैरसमज झाले. आपल्याच भागातील लाकडी-निंबोडी पाणी योजनेच्या माध्यमातून अकरा हजार एकर शेतीला पाणी आपण देणार आहोत. मागच्या राज्यकर्त्यांनी जी अडचण निर्माण केली होती, ती दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. नदीतून वाहून जाणारे पाणी आपल्याकडे वळवून साठवण क्षमात वाढविण्यासाठी मार्ग काढत आहोत. मुळशीचे पाणी मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू. हे मी कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही. हे बरेच दिवसांचे आपले दुखणे आहे. अनेकांनी नुसतीच भूमिपूजनं केली आणि वेळ मारून नेली. मात्र, राष्ट्रवादी वचनपूर्ती करणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत या भागातून चांगले काम झाले पाहिजे. राष्ट्रवादीला कमीपण येणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. दिमाखदार कार्यक्रम केलेला आहे, त्याबद्दल श्रीमंत ढोले यांचे कौतुक करतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.