Buldhana News  Sarkarnama
विदर्भ

Buldhana News : ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या 150 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Farmer's Issue : उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे काढला होता मोर्चा...

जयेश विनायकराव गावंडे

Bori Adgaon Village : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले होते. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी 1 जानेवारीला खामगावातील उपविभागीय कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा आणला होता. आता या मोर्चा प्रकरणात आता खामगाव पोलिसांनी दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव या गावात खामगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी गाव व परिसरातील वयोवृद्ध शेतकऱ्यांनी गावातील ग्रामपंचायती समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. परिसरातील जवळपास दोनशेवर वयाने ज्येष्ठ शेतकरी महिला व पुरुष या उपोषणात सहभागी झाले होते.

यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातील मागण्यांसाठी ज्येष्ठांना उपोषण करण्याची परिसरातील पहिलीच घटना होती. अनेक नागरिकही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळ गाठले.

उपोषण अद्यापही सुरू असून अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी आक्रमक झालेत. त्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला एल्गार करत थेट 51 ट्रॅक्टर्सचा मोर्चा खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आणला. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनीही आंदोलनाला भेट दिली होती. आमरण उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला. स्वाभिमानीचे कार्यकर्ते या ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषणात सहभागी झालेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ट्रॅक्टरचा मोर्चा खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा अडविला. त्यावेळी शेतकरी व पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला व अर्धनग्न आंदोलन सुरू केले. सरकार व पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी आता सुमारे 150 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजी उर्फ रावसाहेब टीकार पाटील, त्यांच्या पत्नी, संदीप शिवाजीराव टीकार पाटील, बंडू शिवाजीराव टीकार पाटील, बाळू खरात, मारोती तायडे, आनंद सुरवाडे, गणेश ठाकरे, ज्ञानेश्वर टीकार, हिम्मत सुरवाडे व श्याम अवथळे यांच्यासह सुमारे 150 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी कापूस आणि सोयाबीनच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या विरोधातही पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे बुलढाण्यातील वातावरण तापले होते. अशात आता पुन्हा याच जिल्ह्यात शेतकऱ्यांविरोधात कारवाई झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.(Farmers Strike)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT