Nagar : अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना२२ जानेवारीला होत आहे.त्याची जय्यत तयार सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने हा कार्यक्रमासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राज्यव्यापी अधिवेशन शिर्डी (ता. राहाता) येथे सुरू आहे. या शिबिरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या आहाराविषयी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. या वक्तव्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहरी होता. १४ वर्षे वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात?', असे वक्तव्य करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधून घेतले आहे. 'आपण इतिहास वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्षे जंगलात असणारे राम शिकार करायचे', असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानाचे हिंदू संघटनांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. यावर तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंत सुधीरदास यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
महंत सुधीरदास म्हणाले, "जितेंद्र आव्हाड यांचे हे विधान म्हणजे मुर्खपणाचे विधान आहे. वाल्मिक रामायणापासून ते कुठल्याही १४ रामायणांमध्ये प्रभू श्रीराम मांसाहारी होते, याचा उल्लेख नाही. प्रभू श्रीराम हे फळ, कंदमुळ खाऊन ब्रह्मचारीयत्व पत्करून वनवासात राहिले आहेत, असा उल्लेख सापडतो". अयोध्येत उभारत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणामुळे भारतात राममय वातावरण झाले आहे. राक्षसांना जसा त्रास होतो, तसाच त्रास जितेंद्र आव्हाड यांना होत आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करतो, असे महंत सुधीरदास यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाची सुरूवात ध्वजवंदनाने झाली. यावेळी शरद पवार उपस्थित होते. ते अजून अधिवेशनात काहीच बोलले नाही.ते उद्या (गुरुवारी) बोलणार आहेत. यातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानातून वाद निर्माण केला जात आहे. त्यामुळे अधिवेशनात शरद पवार काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानाचे हिंदू संघटनेत पडसाद उमटू लागले आहे. निषेध होऊ लागला आहे. यातच राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय अधिवेशन साईंच्या शिर्डीत होत आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे हे अधिवेशन हिंदू संघटनेच्या नजरेत आले असून, निषेधासाठी अधिवेशनस्थळी हिंदू संघटना आक्रमक होणार असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिवेशनावर उद्याच्या शेवटच्या दिवशी तणावाचे वातावरण असल्याची शक्यता आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.