Effigy of Manoj Jarange Patil. Sarkarnama
विदर्भ

Buldhana News : मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा जाळला, गुन्हा दाखल

Protest Against Manoj Jarange Patil : बुलढाण्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील सायंदेव येथील घटना

जयेश विनायकराव गावंडे

Police Department in Action : मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा जाळल्याच्या घटनेनंतर बुलढाणा पोलिस सतर्क झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील सायंदेव येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना पाठिंबा व विरोध दोन्ही सहन करावं लागत आहे. अशात त्यांचा पुतळा जाळण्यात आल्यानं बुलढाणा पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. (Effigy of Maratha Reservation Protestor Manoj Jarange Patil Burnt In Sayandeo Village of Sindkhedraja of Buldhana)

मराठा आरक्षण जालना जिल्ह्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात व विदर्भात पोहोचले. आरक्षणाचा विषय तापलेला असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात असलेल्या सायंदेव येथे मंगळवारी (ता. २१) रात्री आंदोलन झाल्यानं खळबळ उडाली. जरांगे पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी कारवाईही करण्यात आली आहे. सायंदेव येथे काहींनी एकत्र येत घोषणाबाजी केली. त्यानंतर जरांगे पाटील यांचा पुतळा पेटविण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच किनगावराजा पोलिसांनी सायंदेव गाव गाठलं. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस उपअधीक्षक अजयकुमार मालवीय यांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिस हेडकॉस्टेबल अब्दुल रहेमान परसुवाले यांनी फिर्याद दाखल केली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोपान नामदेव खरात, सज्जन गणेश शेळके, अरुण जगन खरात, संदीप जनार्दन खरात, गणेश आसाराम नागरे यासह तीन ते चार जणांचा यात समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलकांनी जरांगे यांचा पुतळा का जाळला याबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही. यांसदर्भात तपास करण्याचे आदेश बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोशल माध्यमांवरील पोस्ट व्हायरल झाल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी तणावाचं वातावरण होतं. तीन तालुक्यांमध्ये तणाव असल्यानं पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. अशात सिंदखेडराजा तालुक्यात अचानक झालेल्या या आंदोलनामुळं पोलिसांची धावाधाव झाली. या आंदोलनाचे पडसाद अन्यत्र उमटणार नाही, यासाठी जिल्ह्यातील अनेक भागांमधील गस्त वाढविण्यात आली आहे.

भौगोलिकदृष्ट्या बुलढाणा जिल्ह्याचा व्याप प्रचंड आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांचा समावेश आहे. ९ हजार ६४० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या जिल्ह्यात केवळ ३३ पोलिस स्टेशन आहेत. अशात मंगळवारचा दिवस पोलिसांसाठी तणावाचा व धावपळीचा ठरला.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT