Buldhana News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केलेल्या साडेपाच हजार कोटी रुपयांच्या निधीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी तक्रार केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस या तक्रारीवर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी (Farmer) संवाद मेळावा व 'सेवा संकल्प अभियाना'त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याच मेळाव्यात, एकनाथ शिंदे यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती दिली.
एवढा मोठा निधी खर्च होऊनही आपला उमेदवार पडतो, असे विधान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. हाच संदर्भ घेत माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी या निधीच्या खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे. या निधी खर्चात भ्रष्टाचार झाला आहे का? याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तातडीने चौकशी व्हावी. भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्यास, त्यातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
सुबोध सावजी यांच्या या तक्रारीवर, मुख्यमंत्री फडणवीस कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. सुबोध सावजी यांच्या या तक्रारीमुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या किंवा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी इंगळे कुटुंबाच्या घरी जाऊन संवाद साधला, दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली, 'थ्री बीएचके' घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि कुटुंबातील मुलीच्या पोलिस भरतीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा मान-सन्मानावरून रंगला. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांचे नाव वगळण्यात आले. यावरून नगराध्यक्ष गारोळे आणि शिवसेना ठाकरे सेना आक्रमक झाली होती. पत्रिकेत नगराध्यक्षांचे नाव वगळणे म्हणजे माझा नव्हे तर समस्त मेहकर वासियांचा अपमान आहे. राज्याचे नगरविकास मंत्री कार्यक्रमाला उपस्थित असताना असे राजकारण करणे कितपत योग्य? असा सवाल त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.