Nagpur Shiv Sankalp Abhiyan : ‘माझ्यावर उठसूठ आरोप केले जात आहेत. ही दाढी हलकी समजू नका. दाढीची काडी फिरवली तर तुमची लंका जाळून टाकेल. माझ्या नादाला लागू नका. मला आडवा आला की मी त्याला सोडत नाही’, असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला.
नागपूर जिल्ह्याच्या रामटेक येथे शिवसंकल्प अभियानाला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. आपण करत असलेल्या विकास कामांबाबत सतत टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी जाहीर सभेतून शिवसेना ‘स्टाइल’ने इशारा देऊन टाकला. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी आडव्या हाताने घेतले. आपल्यावर सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
रामटेक येथे शिवसंकल्प अभियानाला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सडेतोड बोलण्याचे दर्शन पुन्हा एकदा विदर्भवासियांना बघायला मिळाले. यावेळी त्यांनी विरोधकांना त्यातही उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना आडव्या हाताने घेतले. उद्धव ठाकरे श्रीरामाविरोधी आहेत याचेही अनेक दाखले त्यांनी जाहीर सभेत दिले. काही लोक श्री रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात. आम्ही अयोध्येला जात होतो. मात्र आमच्या बॅगा विमानातून काढायला लावल्या होत्या, असे शिंदे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंमुळे आपल्याला श्रीरामाचे दर्शन घेता आले नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ‘जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं’ असे सांगत शिंदे म्हणाले की, याचा परिणाम असा झाला की श्रीरामाचे आशीर्वादाने आमचे सरकार आले आहे. ठाकरेंकडून सातत्याने पक्ष चोरला, बाप चोरला असे तेच ते म्हणणे सुरू असते. एखाद्या बालकाप्रमाणे त्यांनी कृती सध्या सुरू आहे. बाळासाहेब चोरायला काय एखादी वस्तू आहेत का?, असा सवालही एकनाथ शिंदेंनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपण करीत असलेली चांगली कामे खासदार संजय राऊत यांना पचत नाहीत. त्यामुळे कोणीतरी संजय राऊत यांना हाजमोला पाठवा, अशी टीप्पणी शिंदे यांनी केली. त्यामुळे राऊतांना बऱ्याच गोष्टी ‘डायजेस्ट’ होतील, असा खोचक टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.
रामटेक येथील शिवसंकल्प अभियानात शिंदे यांनी ‘फिर एकबार आपकी मोदी सरकार’चा नारा दिला. येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसवायचा संकल्प करण्यात आला आहे. काँग्रेस सरकारने केलेले घोटाळे जनतेसमोर असल्याच्या उल्लेख शिंदे यांनी केला. नरेंद्र मोदींनी केलेले काम जनतेपुढे आहे. दहा वर्षात मोदींना डाग लावण्याची हिंमत कुणी केली नाही. आपल्याला लोकांची कामे करायची आहे, असेही शिंदे म्हणाले.
रामटेकच्या कार्यक्रमात पावसाने हजेरी लावली. पाऊसदेखील सभेला आशीर्वाद द्यायला आल्याचे शिंदे म्हणाले. मोदींविरुद्ध तयार करण्यात आलेली इंडिया आघाडी म्हणजे दहामुंडी रावण असल्याच्या टोलाही त्यांनी लगावला. शेवटपर्यंत आपण शिवसेना पक्षाचे कार्यकर्ता राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.