RTO Firing Case : आरटीओतील वसुली पथकांना हिशोब न जुळल्याने झालेल्या वादातून निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या निरीक्षक गीता शेजवळ यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे. त्यामुळे शेजवळ यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालविली आहे.
वसुलीचा हिशोब न जुळल्याने शेजवळ आणि गायकवाड यांना नागपूर आरटीओतील एका बड्या अधिकाऱ्याने सर्व काही ‘ओके’ करून देण्याचे आदेश दिले होते. नागपुरात संकेत गायकवाड यांचे घर आहे. येथे शेजवळ आणि गायकवाड गणित जुळवित बसले होते. अशातच शेजवळ यांनी गायकवाड यांच्यावर शासकीय बंदुकीतून गोळी झाडली.
शेजवळ यांनी झाडलेली गोळी गायकवाड यांच्या एका मांडीतून आरपार जात दुसऱ्या मांडीत घुसली होती. त्यानंतर गडचिरोलीचे डेप्युटी आरटीओ विजय चव्हाण यांनी गायकवाड यांना नागपूरच्या धंतोलीतील एका खासगी इस्पितळात दाखल केले होते. 2022 मधील गोळीबाराच्या या प्रकरणात तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना अनेक बाबी संशयास्पद जाणवल्या.
अमितेश कुमार यांनी गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे तत्कालीन उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्याकडे सोपविला. सुदर्शन व त्यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी करीत गोळीबार प्रकरणातील सत्य उकरून काढले. त्यामुळे शेजवळ यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा तर गायकवाड यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुन्हा दाखल होताच शेजवळ यांनी नागपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. अटक टाळण्यासाठी त्यानंतर शेजवळ उच्च न्यायालयात गेल्या. तेथेही त्यांना न्यायालयाने तातडीचा दिलासा नाकारला. अंतरिम जामीन मंजूर केला. या प्रकरणी सरकारी व बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयानेही शेजवळ यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
नागपुरातील आरटीओ कार्यालय व महाराष्ट्रातील एकूणच परिवहन विभाग वादाच्या भोवऱ्यात आहे. शेजवळ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही अहवाल पाठविला आहे. आता शेजवळ, गायकवाड यांच्याविरोधात अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील अशा अधिकाऱ्यांना कोणता ‘गॉडफादर’ वाचवित आहे, हे शोधणे गरजेचे आहे.
शेजवळ आणि गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांना नागपुरातील शंकरनगरातील एका आलिशान हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. व्हिडिओची तपासणी केल्यानंतर हॉटेलमध्ये आरटीओतील काही अधिकारी पैशांची हिस्सेवाटणी करताना दिसले. त्यामुळे गोळीबाराच्या या प्रकरणामागे आरटीओची वसुली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशात नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. ‘ईडी’, ‘एसीबी’ आता का डोळे बंद करून बसली आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.