Baba Bageshwar Sarkarnama
विदर्भ

Bageshwar Baba: "युद्ध करुन थकल्यानं शिवरायांनी समर्थ रामदास स्वामींकडं राजपाट सोपवला"; फडणवीसांसमोरच धीरेंद्र शास्त्री बरळले

Bageshwar Baba: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आज नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

Amit Ujagare

Bageshwar Baba: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी आज नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. युद्ध करुन थकल्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याची सगळी सुत्रं समर्थ रामदास स्वामी यांच्याकडं सोपवून दिली होती, असं विधान त्यांनी केलं आहे. यामुळं वाद होण्याची शक्यता आहे.

धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे व्यासपीठावर असताना भाषण करताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करुन थकले तेव्हा ते समर्थ रामदास स्वामींकडं गेले आणि त्यांनी आपला मुकूट उतरवला आणि म्हटलं की, आम्ही बऱ्याच लढाया लढलो, अनेक युद्ध केले पण आता आम्हाला लढायचं नाही. आता आमच्यावर दया करा की हा मुकूट आणि राजपाट तुम्हीच सांभाळा. तुमच्याच आदेशानं आम्ही चाललो पण आता आमच्याकडून युद्ध लढलं जाणार नाही आम्हाला आराम करायचा आहे"

भाकड कथा - इंद्रजीत सावंत

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "उत्तरेकडील हे जे बाबा महाराज आहेत त्यांच्या डोक्यात शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास डोक्यात बसला आहे. शिवाजी महाराज हे लढून थकणारे नव्हते हे जगजाहीर आहे कारण तसे संदर्भ देखील नाहीत. या सर्वकाही भाकड कथा आहेत, याला इतिहासात एक कणाचा देखील आधार किंवा पुरावा नाही.

त्याचबरोबर रामदास स्वामींकडं त्यांनी सगळा राजपाट सोपवला हे सर्व थोतांड आहे. याविषयी काही बोगस कागदपत्रे लंडनमधून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता. यावर इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी स्वतःचं सांगितलं होतं की हे सगळं काही खोटं आहे. ही उत्तरेकडील माणसं येऊन महाराष्ट्राला इतिहास शिकवत आहेत. ज्यांच्या कित्येक पिढ्या मुघलांची गुलामी करण्यात गेल्या. पण महाराष्ट्र स्वाभिमानानं या परकीय राजवटींविरोधात उभा राहिला. महाराष्ट्रानं अशा इतिहासाचा अभ्यास नाही, महाराष्ट्राबद्दल कणवं नाही त्यांना महाराष्ट्रातील लोक का बोलवतात याचा बुद्धी शाबूत ठेवून विचार करायला पाहिजे"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT