Buldana District Bank- Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Tupkar Warning Buldana Bank : बुलडाणा बॅंकेच्या निर्णयावर रविकांत तुपकर प्रचंड संतापले; अधिकाऱ्यांना बदडण्याचा दिला इशारा

Buldana District Bank News : शेतकऱ्यांच्या सातबारावर बँकेने चक्क जप्तीचा बोजा चढविल्याच्या नोंदी केल्या आहेत.

Vijaykumar Dudhale

Buldana News : अवकाळी पाऊस, गारपीट त्यानंतर अतिवृष्टी, पूर यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांवर संकटं कोसळत असताना सरकारमधील एकही वरिष्ठ नेता शेतीच्या बांधापर्यंत आलेला नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशातच बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांसह शेतकरी नेतेही संतापले आहेत. बँकेच्या या निर्णयाच्या विरोधात आता आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. (Farmer leaders were angry over the decision of Buldana District Bank)

शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या काळात याच बँकेने शेतकऱ्यांना आधार दिला. मात्र, आता पिकं हातून निसटत असताना बुलडाणा जिल्हा बँक प्रशासनाकडून शेतकऱ्यांसोबत दगा फटका केला जात आहे. शेतकऱ्यांच्या सातबारांवर बँकेने चक्क जप्तीचा बोजा चढविल्याच्या नोंदी केल्या आहेत. या नोंदी करत बँकेने विश्वासघात केल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे.

बँका पीक कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या जमिनीवर म्हणजेच सातबारा उताऱ्यावर बोजा चढवतात. मात्र, बुलडाण्यातील बँकेने सातबारावर जप्ती बोजा चढविला आहे. या प्रकारामुळे दीड लाख रुपयांचे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम थकीत असलेले सुमारे तीन हजारांवर कर्जदार शेतकरी हादरले आहेत. राज्य सरकारने यात लक्ष द्यावे आणि दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना तारावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

बँकेकडून करण्यात आलेल्या या प्रकाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच संतापले आहेत. यासंदर्भात आक्रमक प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, बँकांनी आधी धनाढ्य व कर्जबुडव्यांकडून वसुली करावी. अनेक राजकीय नेतेही थकबाकीदार आहेत. त्यांना दिलेले कर्ज आधी वसूल करण्यात यावे. त्यानंतर शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीचा विचार करावा. शेतकऱ्यांकडे बळजबरीने कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रसंगी बदडून काढण्यात येईल, असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.

यासंदर्भात बँकेनेही आपली बाजू मांडली आहे. जप्ती बोजा चढविण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू केली होती. पण, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. परंतु, ज्या शेतकऱ्यांना अशा नोटीस गेलेल्या आहेत, केवळ त्यांच्याच सातबारावर बोजा चढवला गेला आहे, असे जिल्हा बँकेचे प्रशासक खरात यांनी सांगितले.

या प्रकरणात नेमके सत्य ते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेच्या या कारवाईमुळे सध्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतित झाला आहे. शेतकऱ्यांची एकूणच आर्थिक परस्थिती पाहता बँकेने वस्तुस्थितीच्या आधारावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही पुढे आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT